मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्याही इतिहासात ‘हुतात्मा चौक’ या स्थानाला विशेष महत्त्व आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात याच ठिकाणी १०६ जण हुतात्मा झाले होते. आगामी ‘१०६ हुतात्मा चौक-संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या चित्रपटाच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत होणार आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ‘श्री स्वामी समर्थ पिक्चर्स’तर्फे चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल इनामदार करणार असून कथा कौस्तुभ सावरकर यांची आहे. हा चित्रपट एका काल्पनिक व्यक्तिरेखेच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. ही व्यक्तिरेखा कर्नाटकातील निपाणी या गावातील दाखविण्यात आली असून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा तो एक साक्षीदार आहे. चित्रपटात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी घडलेले राजकीय आणि सामाजिक प्रसंग व नाटय़ पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
संयुक्त महाराष्ट्रासाठी मुंबईतील ‘फ्लोरा फाऊंटन’ येथे आंदोलन करणाऱ्यांवर अमानुषपणे गोळीबार करण्यात आला होता. यात १०६ जण मृत्युमुखी पडले होते. पुढे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या आंदोलनक र्त्यांच्या स्मृतीची आठवण व त्यांना आदरांजली म्हणून ‘फ्लोरा फाऊंटन’चे नामकरण हुतात्मा चौक असे करण्यात आले. हुतात्मा चौकात येथे स्मृतिस्तंभही उभारण्यात आला आहे.
चित्रपटातील कलाकार अद्याप नक्की झालेले नाहीत. कलाकारांची निवड लवकरच करून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. पुढील वर्षी १ मे रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचा संबंधितांचा प्रयत्न आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आणि लढय़ाचा हा इतिहास सगळ्यांपर्यंत विशेषत: आजची तरुण पिढी, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या संकल्पनेतून हा चित्रपट तयार होत असल्याचे दिग्दर्शक विशाल इनामदार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा