बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्ध झालेली मॉडेल उर्फी जावेद तिच्या अनोख्या फॅशनसाठी ओळखली जाते. ती तिच्या स्पष्टवक्तेपणामुळेही सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. उर्फी कधी कपड्यांमुळे तर कधी वादामुळे चर्चेत असते. आता उर्फीवर कमेंट केल्यामुळे एक हॉकीपटू अडचणीत आला आहे. कारण उर्फीने त्याच्या कमेंटचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे.
उर्फी जावेदला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. मात्र, ती बातमी खोटी असल्याचं उर्फीने सांगितलं होतं. त्यानंतर तिने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती म्हणाली होती की ‘संपूर्ण देश मला तुरुंगात पाहू इच्छित आहे’. हा व्हिडीओ एका इन्स्टाग्रामरनेही त्याच्या अकाउंटवर शेअर केला होता.
हॉकीपटू युवराजने त्या व्हिडीओवर कमेंट केली होती. “धन्यवाद दुबई. प्लिज तिला नेहमी तिथेच ठेवा, मी तुमचा ऋणी राहीन”, असं तो म्हणाला होता. त्यानंतर उर्फी जावेदने युवराजला रिप्लाय दिला. युवराजला टॅग करत उर्फी म्हणाली, “युवराज, तुला माझ्या कपड्यांचा खूपच त्रास आहे, पण तरीही तू मेसेज करतोस.” आणखी एक कमेंट करताना उर्फीने लिहिले, “अरे, माझ्याकडे तू मला आणि बाकीच्या ९९९९९ मुलींना पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉटही आहे.”
युवराजने दिलं प्रत्युत्तर
त्यावर युवराजने आपण कधीही उर्फीला मेसेज केला नसल्याचं म्हटलंय. “तसं असतं तर तिने माझ्या मेसेजचा स्क्रीनशॉट आधी टाकला असता. बॉलीवूडमध्ये माझे अनेक मित्र आहेत जे मला तिला उत्तर देऊ नकोस, असं सांगतात. मी तिच्या कपड्यांवर कमेंट केलेले माझे मेसेज तिने दाखवावे, हिला प्रमोट करणं बंद करावं, त्यासाठी एका इन्स्टाग्रामरच्या पोस्टवर कमेंट केली होती. मी कोणावरही कमेंट करत नाही, पण समोरच्या व्यक्तीला कधी आणि कसे कपडे घालायला हवे, हे कळलं पाहिजे. दीपिका पदुकोण बिकिनीमध्ये पत्रकार परिषद घेणार नाही.”
नंतर उर्फी जावेदने युवराजचा एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला जिथे तो उर्फीला हालचाल विचारत होता. आपण लोकप्रिय नसतानाचा हा मेसेज असल्याचं उर्फीने सांगितलं.
उर्फी जावेदने एक व्हिडीओ शेअर करून तिची बाजू मांडली. “आपण जेव्हा पब्लिक फीगर असतो आणि आपलं अकाउंट व्हेरिफाय असतं, तेव्हा फार विचारपूर्वक कमेंट करायला पाहिजे. मी तुरुंगात जायला पाहिजे, असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्हा लोकांमुळेच मला कधी बलात्कार तर कधी जीवे मारण्याच्या धमक्या येतात,” असं उर्फी म्हणाली.