होळी आणि बॉलिवूड यांचं एक खास नातं आहे. ज्याप्रमाणे होळी आणि धुळवडीचं नातं रंगांमधून व्यक्त होतं, त्याचप्रमाणे या रंगांची खरी मजा होळीवर आधारित एखाद्याने गाण्याने येते. आजवर अनेक चित्रपटांमध्ये होळीवर आधारित गाणी असल्याचं पाहायला मिळतं. आजही ही गाणं होळीच्या दिवसांमध्ये ठिकठिकाणी ऐकायला मिळतात. अगदी ऐंशीच्या दशकापासून आजपर्यंत होळीवर आधारित अनेक बॉलिवूड गाणी तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे चला तर पाहुयात अशीच काही सदाबहार होळी आणि रंगपंचमीची गाणी –
शोले-
भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेकांच्या पसंतीस उतरलेला आणि आजच्या घडीलाही प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या जय-वीरुच्या ‘शोले’ चित्रपटात होळीचे रंग पाहायला मिळाले होते. नायक अमिताभ बच्चन, धर्मेद्र आणि बसंतीच नव्हे तर या चित्रपटातील खलनायक गब्बर सिंग होळीची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसले होते. ‘कब है होली…’ हा डायलॉग आजच्या घडीलाही चांगलाच प्रसिद्ध आहे.
सिलसिला-
अमिताभ बच्चन यांच्या या दमदार चित्रपटानंतर त्यांच्या ‘सिलसिला’ या चित्रपटातही होळीच्या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. या चित्रपटात अमितच्या भूमिकेत दिसले अमिताभ आणि चांदणीची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या रेखा यांचा अभिनय जेवढा लोकांच्या लक्षात आहे, अगदी तेवढेच या चित्रपटातील ‘रंग बरसे…’ हे गाणे देखील लोकप्रिय आहे.
दामिनी-
मीनाक्षी शेषाद्री अभिनित ‘दामिनी’ चित्रपटातील सनी देओलचा ‘तारिख पे तारिख’ हा डायलॉग खूपच लोकप्रिय आहे. न्यायाची मागणीसाठी कोर्टाच्या दारी चकरा घालणाऱ्या दामिनीच्या या चित्रपटातही मीनाक्षी शेषाद्री आणि ऋषी कपूर होळीच्या रंगात रंगलेले दिसले होते.
डर-
यश चोप्रा निर्मित ‘डर’ या चित्रपटात शाहरुख खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. किरणचे प्रेम मिळविण्यासाठी काहीही करण्यास तयार असणारा राहुल म्हणजेच किरण, सनी देओल आणि जूही चावला होळीच्या रंगात रंगल्याचे पाहायला मिळाले होते.
मोहब्बते-
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि बादशहा शाहरुख खान या जोडीने किती चित्रपटात काम केले यापेक्षा कोणत्या चित्रपटात शाहरुखने अमिताभ यांना रंग लावला हा जर विचार केला तर ‘मोहब्बते’ चित्रपटातील अमिताभ यांचे गुरुकूल आणि शाहरुखने होळी साजरी करण्यासाठी केलेली विनंती तुम्हाला नक्कीच आठवेल. बॉलिवूडमधील होळीचा एक वेगळा रंग या चित्रपटात दिसला होता.
ये जवानी है दिवानी-
बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी दीपिका आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअप तसे कुणासाठीच नवं नाही. ही जोडी पुन्हा ऑनस्क्रिन एकत्र दिसेल का? सांगता येणे कठिण आहे. पण ‘ये जवानी दिवानी’ चित्रपटातील ‘बलम पिचकारी..’ या गाण्यातील त्यांच्या केमिस्ट्रीने एक वेगळाच रंग भरला होता. चित्रटातील या गाण्याची आजही लोकप्रियता दिसून येते.
रामलीला-
रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर सध्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या प्रेमाच्या चांगल्याच चर्चा रंगाताना दिसतात. प्रेमाला दोघांनीही अधिकृतरित्या दुजोरा दिला नसला तरी दोघांच्या प्रेम कहाणी अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरताना दिसते. बॉलिवूडमधील या गोड जोडीने ‘रामलीला’ चित्रपटात होळीचे रंगाची उधळण केल्याचे पाहायला मिळाले होते.
बॉलिवूडप्रमाणेच मराठी कलाविश्वातही होळीवर आधारित अनेक उत्तम गाणी आहेत. यामध्ये ‘नटून थटून पंचीम आली औंदाच्या ग साली’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, ‘राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’, ‘किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला’, ‘अग नाच नाच राधे उडवू या रंग, रंगामधी भिजलं तुझं गोरं गोरं अंग’, ‘खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा’, ‘सख्या चला बागामंदी रंग खेळू चला’, ‘होळीचं सोंग घेऊन लावू नको लाडीगोडी’ ही गाणी विशेष लोकप्रिय आहेत.