गंभीर विषयाची तितक्याच गांभीर्याने खिल्ली उडवणारे चित्रपट येतात ते कलात्मक विनोदाचा सोस म्हणून. भूतपटांचे आणि भूत या संकल्पनेचे वाजवी सुरात विडंबन करणारी ‘स्केअरी मूव्ही’ मालिका किंवा झॉम्बी-व्हॅम्पायरपटांमधली रक्तपीपासा आजच्या कॉर्पोरेट विश्वाशी जोडून त्यातले भीतीतत्त्व हास्यात परावर्तित करणाऱ्या ‘शॉन ऑफ द डेड’ पाहताना गंमत वाटते ती त्यांच्यात जाणीवपूर्वक केलेल्या आशय विरोधाभासामुळे. चित्रपट सुरू झाल्यानंतर साधारणत: आकलनातून ज्या कथानक वळणाची अपेक्षा प्रेक्षक करेल त्याला शेवटपर्यंत चकवत ठेवण्याचे कौशल्य असे चित्रपट नेहमी करतात. विडंबनामध्ये कल्पनेचे वारू वाटेल त्या मार्गाने वाहत असल्यामुळे तेथे फक्त विनोदमौजेची धार अधिकाधिक पातळीवर वाढविण्याचे प्रयत्न होतात. नेटफ्लिक्स आणि सध्याच्या अमेरिकी समांतर सिनेमाच्या चळवळीतील अग्रणी निर्माते-दिग्दर्शक मार्क व जे डय़ुप्लास यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘टेक मी’ विडंबनपट नाही, अतिविनोदाचा मारा त्यात नाही, पण चित्रपटांतील अपहरण संकल्पनेची गांभीर्याने खिल्ली उडवत विरोधाभासी आशय निर्माण करण्यात तो यशस्वी होतो.
व्यक्तींचे अपहरण करून पोट भरणाऱ्या सडाफटिंग व्यक्तीचे आपल्या या विचित्र उद्योगाला विस्तारण्यासाठी बँकेच्या प्रतिनिधीला कर्ज मागण्याच्या अजब प्रक्रियेपासून या चित्रपटाला सुरुवात होते. आपल्या उद्योगाचे वर्णन करताना हा ननायक रे मुडी (पॅट हिली) अमेरिकी कार्यक्षमतेचे आणि अमेरिकी लोकांनी ध्येयपूर्तीसाठी वेचलेल्या कष्टांचे पाढे वाचत बसतो. सेल्फ-हेल्प पुस्तकी भाषेतील हा संवाद मोठा गमतीशीर आहे. उद्योग ऐकून चकित बँक कर्मचारी त्याच्यावर डाफरते, तिथे स्वाभिमान दुखावल्याने संतापून रे निघून जातो.
रे याच्या जगण्याच्या एकूण तपशिलातून त्याचे पापभीरूपण बिंबविले जाते. ‘किडनॅप सोल्यूशन’ नावाची वेबसाइट काढून तो लोकांना त्यांच्या मरगळलेल्या आयुष्यात नाटय़ मिळवून देण्यासाठी अपहरणाचा उद्योग चालवत असतो. त्याची ही भुरटी सेवा घेणाऱ्यांमध्ये विविध प्रकारच्या भुरटय़ा, व्यसनांध व्यक्तींचा समावेश असतो. ड्रग अॅडिक्ट, भस्म्या रोग झाल्यासारखे बेताल खाणाऱ्या वल्ली, आयुष्यात कंटाळ्याशिवाय काहीही घडत नसलेल्या व्यक्ती विशिष्ट तास त्याला अपहरण करायला सांगून त्या बेतीव घटनेची अधिकाधिक दहशत मनात बाळगत आनंदी होत असतात. रे याचा हा व्यवसाय भरभराटीचाच असतो, कारण त्याला गरज असलेल्या व्यक्ती समाजात जागोजागी घाऊक स्वरूपात उपलब्ध दिसतात. रे अतिशय निष्णात डॉक्टरसारखा अपहरणाचा घाट घालून त्यांना कोणतीही शारीरिक इजा न पोहोचविता अपहरणाची जरब घालतो.
रे याचा हा उद्योग सुरळीतपणे सुरू असतानाच त्याच्या फोनवर घाऊकरीत्या तीनेक दिवसांचे अपहरण करण्याच्या मोबदल्यामध्ये बऱ्याच मोठय़ा रकमेचे आमिष ठेवले जाते. आपल्या अपहरणातील सभ्यतेच्या तत्त्वांना अंमळ मुरड घालून तो बँकेतील बडय़ा पदावर असलेल्या अॅना सेंट ब्लेअर (टेलर शिलिंग) हिचे अपहरण करतो. आपल्या तळघरात तिला बांधून ठेवतो. पण आत्यंतिक कठोर आणि कोणत्याही प्रकारच्या धक्क्यांचा, दुर्घटनांचा ओरखडा न उमटणाऱ्या अॅनाला अपहरण आनंद देण्यात रे कमी पडायला लागतो. उलट काही कालावधीनंतर अॅनाच रे याच्यावर उलटचाल करते. टीव्हीवर अॅनाच्या बेपत्ता होण्याची बातमी लागते. पोलीस त्याच्या घराबाहेर चौकशीसाठी दाखल होतात आणि गैरसमज-अपसमज आणि करारी ग्राहक यांमुळे रे याचा हा अपहरण उद्योग त्याचीच भलती गंमत करण्यासाठी सज्ज होतो.
चित्रपट आत्यंतिक गंभीरपणे इथली विनोदी परिस्थिती हाताळतो. स्वत: अभिनेता पॅट हिली इथला दिग्दर्शक असल्याने रे याचे व्यक्तिचित्र ऐसपैस रंगविण्यात आले आहे. लादलेले एकटेपण उपभोगताना तो आत्यंतिक प्रामाणिकपणे वावरताना दिसतो. त्याचे कित्येक गमतीशीर नमुने येथे दिसतात. आपल्या बहिणीच्या घरी पार्टीमध्ये तो मेहुण्याकडून पैसे उधार घेताना दिसतो, तिथे लोकांत मिसळण्याऐवजी पाच-दहा वर्षांच्या भाचऱ्यांशी खेळण्यात सगळा वेळ घालवितो. शिस्तशीर अभ्यास करून तो अॅनाला पळवतो मात्र चुकून आपण दुसऱ्याच व्यक्तीला पळविले असण्याच्या शक्यतेने भांबावतो.
समाजात बदलत चाललेल्या आनंदाच्या संकल्पना आणि दु:खाला पळविण्यासाठी अतिशय तिरसट मार्गाचा अवलंब करणाऱ्या व्यक्ती दाखविणाऱ्या ‘फाइट क्लब’ या गाजलेल्या वादग्रस्त सिनेमाशी या चित्रपटाशी काही अंशी तुलना करता येईल. अर्थात (विषय पूर्ण भिन्न असले तरी) ‘फाइट क्लब’च्या आशयात विनोद नाही. जो ‘टेक मी’ या चित्रपटात मुबलक प्रमाणात आहे. समाजात पोखरत चाललेल्या वैचारिक व्यंगाचे दर्शन मात्र दोन्ही चित्रपट बऱ्यापैकी सारखेच घडवितात.
अपहरण आणि ओलिसपटांमधील पारंपरिक थरार येथे उपलब्ध असल्याने चित्रपटात भरपूर मनोरंजनमूल्य सापडते. वेगवान घडामोडी आणि अपहरण गमतीचा हा बाज उत्तम अनुभूती ठरू शकतो.
पंकज भोसले pankajbhosle@expressindia.com