ह्रतिक रोशन हॉलिवूडपटासाठी प्रयत्नशील आहे. ‘फास्ट अँड फ्युरिअस’ या हॉलिवूडपटाचा दिग्दर्शक जेम्स वॅन याने ह्रतिकची भेट घेतल्यानंतर त्याच्या हॉलिवूड प्रवेशाबद्दलची चर्चा रंगली आहे. मात्र, त्याआधीच एका हॉलिवूड अभिनेत्याचा वाईट अनुभव ह्रतिकच्या पदरी पडला आहे. अर्थात, या अनुभवानंतरही आपल्या देशी सुपरहिरोने त्या अभिनेत्याबद्दल कुठलीही वाईट प्रतिक्रिया न देता उलट त्याला त्या प्रसंगातून बाहेर पडण्यास मदतच केली. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर ह्रतिक रोशन आणि हॉलिवूड टीव्हीवरील प्रसिध्द मालिका ‘मिस्टर सेल्फ्रिज’मधील लोकप्रिय अभिनेता जेरेमी पिवन एकाचवेळी आले होते. जेरेमीचा पासपोर्ट गहाळ झाला होता. त्याचवेळी विमानतळावरील अधिकाऱ्यांकडून त्याला एक अभिनेता म्हणून शाही वागणूक तर मिळत नव्हतीच; पण, अधिकाऱ्यांनी त्याला तुमची ओळख पटत नाही, असे सांगून पासपोर्टसाठी अडवून ठेवले. या सगळ्या प्रकाराने वैतागलेल्या जेरेमीने तिथेच भांडण करण्यास सुरुवात केली. ह्रतिकने त्या परिस्थितीत मध्ये पडून जेरेमीला मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेरेमीने त्यालाच बोल लावत तिथून निघून जाण्यास सांगितले.
ह्रतिक कोण आहे, याची ओळख जेरेमीलाही नसावी. आपल्या चाहत्यांपैकीच एखादा उगाचच आपल्याला मदत करण्याच्या बहाण्याने सलगी दाखवायचा प्रयत्न करत असल्याची समजूत त्याने करून घेतली. आणि ह्रतिकला तिथून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. तरीही आमच्या सह्रदयी सुपरहिरो अभिनेत्याने संयम बाळगत त्याला मदत केली. त्याने जेरेमीच्याही नकळत अधिकाऱ्यांना त्याला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. या प्रसंगानंतरही जेरेमीला ह्रतिकची ओळख पटण्याची शक्यता कमीच होती. पण, आपल्या देशात आपण कितीही सुपरहिरो असलो तरी हॉलिवूडसाठी अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे, याची प्रचिती ह्रतिकलाही या अनुभवाने दिली असावी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा