प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते रॉबर्ट डी नीरो मे २०२३ मध्ये ७९ व्या वर्षी बाबा झाले. आता त्यांनी एका मुलाखतीत आपल्या सातव्या अपत्याच्या जन्माबद्दल आनंद व्यक्त केला. या वयात बाबा होणं ही खूप आनंद देणारी भावना आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. दोन वेळा ऑस्कर विजेते रॉबर्ट डी नीरो यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी आपल्या सातव्या बाळाचे स्वागत केले होते. रॉबर्ट व त्यांची जोडीदार टिफनी चेन यांनी त्यांच्या मुलीचे नाव जिया ठेवले आहे.
रॉबर्ट डी नीरो यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या चिमुकल्या लेकीला पाहून आपली सगळी काळजी, चिंता दूर होतात, असं त्यांनी म्हटलं आहे. “मी कोणत्याही कामात व्यग्र असेल किंवा जेव्हा मला काळजी वाटत असते, तेव्हा मी तिच्याकडे पाहतो आणि ती काळजी दूर होते, हे खूप आश्चर्यकारक आहे,” असं रॉबर्ट म्हणाले. यासंदर्भात हिंदुस्तान टाइम्सने वृत्त दिलंय.
“ती खूप गोड आहे आणि जेव्हा ती माझ्याकडे पाहते तेव्हा तिच्याकडे पाहतच राहावं वाटतं. त्यामुळे ती मोठी झाल्यावर कुठे जाईल हे मला माहित नाही पण ती विचार करत आहे आणि ती सर्व काही पाहत आहे. तिला असं पाहणं हे खरोखर खूप मनोरंजक आहे. तुम्हाला माहिती आहे की मी ८० वर्षांचा बाबा आहे आणि ही खूप चांगली भावना आहे. मला जमेल तितका जास्त काळ तिच्याजवळ राहायचं आहे,” असं म्हणताना रॉबर्ट भावुक झाले.
दरम्यान, रॉबर्ट यांनी पूर्वीच्या रिलेशनशिपमधून सहा मुलं आहेत. पहिली पत्नी डायह्न ॲबॉटपासून ड्रेना आणि राफेल, टॉकी स्मिथपासून जुलियन आणि ॲरॉन, दुसरी पत्नी ग्रेस हायटॉवरपासून इलियट आणि हेलन ही अपत्ये आहेत. जिया त्यांचं सातवं बाळ आहे.
रॉबर्ट यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांना मार्टिन स्कॉर्सेसच्या ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’मध्ये त्यांच्या सहाय्यक भूमिकेसाठी आणखी एक अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.