बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन येत्या काही दिवसांत हॉलिवूडच्या चित्रपटात मुख्य भूमिका करताना पहायला मिळाला, तर नवल वाटून घेऊ नका. आपल्या चोखंदळ भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या ह्रतिक रोशनने बुधवारी मुंबईत हॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रॉब कोहेन यांची भेट घेतली. हॉलिवूडमध्ये गाजलेल्या ‘फास्ट अॅण्ड फ्युरियस’ चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून रॉब कोहेन यांची ओळख आहे. यावेळी ह्रतिकसोबत त्याचे वडील राकेश रोशन आणि आई पिंकी रोशनसुद्धा उपस्थित होते. या भेटीमुळे ह्रतिक रोशन आता रॉब कोहेन यांच्या आगामी चित्रपटात दिसणार का याबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. दिग्दर्शक म्हणून रॉब कोहेन यांच्या नावावर आतापर्यंत ‘ड्रॅगन: द ब्रुस ली स्टोरी’, ‘ड्रॅगनहार्ट’ आणि ‘फास्ट अॅण्ड फ्युरियस ‘यांसारखे यशस्वी चित्रपट जमा आहेत. ह्रतिक रोशन सध्या अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत ‘बँग बँग’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. तसेच बॉलिवूड दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या ‘मोहेंजदडो’ या आगामी चित्रपटात ह्रतिक काम करताना दिसणार आहे.  

Story img Loader