बॉलिवुडचा ‘ग्रीक गॉड’ अशी बिरुदावली मिळवणारा ‘क्रिश’ अर्थात हृतिक रोशन आता हॉलिवुडपटात चमकताना दिसणार आहे, म्हणजे तशी शक्यता निर्माण झाली आहे. ‘फास्ट अँड फ्युरियस’ या हॉलिवुडमध्ये प्रचंड गाजलेल्या चित्रपटाचा दिग्दर्शक रॉब कोहेन यांची नुकतीच हृतिक आणि राकेश या रोशन पिता-पुत्राने भेट घेतली. त्यामुळे आता हृतिक हॉलिवुडमध्ये जाणार अशी चर्चा ‘टिन्सेल टाऊन’मध्ये रंगली आहे. ‘क्रिश’च्या यशानंतर हृतिक रोशन आता ‘बँग बँग’ या सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटात काम करतो आहे. हा चित्रपट म्हणजे टॉम क्रूझ आणि कॅमेरॉन डियाझ यांच्या गाजलेल्या हॉलीवूडपट ‘नाइट अॅण्ड डे’चा रिमेक आहे. अॅक्शनदृश्यांनी भरलेल्या या चित्रपटासाठी अर्थातच हॉलिवुडच्या स्टंट दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली हृतिक अॅक्शनचे धडे गिरवतो आहे. मात्र, रॉब कोहेनच्या भेटीमुळे बॉलिवुडमध्ये त्याच्या हॉलिवुड प्रवेशाचीच चर्चा जास्त रंगली आहे. ‘फास्ट अॅण्ड फ्युरिअस’फेम पॉल वॉकरचे अकाली निधन झाल्यामुळे आता पुढील भागात त्याचा भाऊ कॉडी वॉकरला रॉबने पाचारण केले आहे. याच चित्रपटात हृतिकला भूमिका देण्याविषयी रॉब आणि रोशनद्वयी यांच्यात चर्चा झाली असावी किंवा काय याबाबतही अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. आयफा सोहळे परदेशात रंगायला लागल्यापासून बॉलिवुडला ‘ओव्हरसीज’ बाजारपेठ काबीज करणे शक्य झाले. आता हृतिकसारख्या स्टार कलावंताला जर हॉलिवुड चित्रपट मिळाला तर बॉलिवुडच्या अन्य बडय़ा स्टार कलावंतांनाही हॉलिवुडपटात काम करण्याचा मार्ग खुला होऊ शकेल, हे मात्र खरे.
हृतिक हॉलिवुडपटात?
बॉलिवुडचा ‘ग्रीक गॉड’ अशी बिरुदावली मिळवणारा ‘क्रिश’ अर्थात हृतिक रोशन आता हॉलिवुडपटात चमकताना दिसणार आहे, म्हणजे तशी शक्यता निर्माण झाली आहे.
First published on: 06-06-2014 at 01:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood calling hrithik roshan meets fast furious director