दमदार बॉलिवूडपटांनी वर्षांची सुरूवात झाली तर प्रेक्षक त्यांच्याकडे पाठच फिरवतील की काय?, अशी जणू समजूत करून बॉलिवूडच्या मोठय़ा कलाकारांनी त्यांचे मोठे आणि यशस्वी होऊ शकतील, अशा चित्रपटांना वर्षांच्या सुरूवातीला नव्हे तर त्यानंतरच्या सहामाहीत स्थान दिले आहे. चित्रपट पुरस्कार सोहळे आणि सुट्टय़ांचे गणित लक्षात घेऊन बॉलिवूडने पहिल्या सहामाहीत कोणत्याही मोठय़ा कलाकारांचे चित्रपट झळकवले नाहीत अपवाद फक्त सलमानच्या ‘जय हो’चा. बॉलिवूडचा हा फंडा यावर्षी मोठय़ा प्रमाणावर भारतात प्रदर्शित झालेल्या हॉलिवूडपटांच्या पथ्यावर पडला आहे. यावर्षी मोठय़ा प्रमाणावर भारतात प्रदर्शित झालेल्या हॉलिवूडपटांनी पहिल्याच आठवडय़ात तिकीटबारीवर कोटींचा पल्ला गाठला आहे.
या आठवडय़ात ब्रायन सिंगर दिग्दर्शित ‘एक्समेन’ चित्रपट मालिकेतला ‘एक्समेन : डेज ऑफ फ्युचर पास्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘एक्समेन’ मालिकेतील आधीचे सर्वच चित्रपट गाजले होते. त्यामुळे याही चित्रपटाबद्दल लोकांमध्ये उत्सूकता होती. परिणामी, या चित्रपटाने इथल्या तिकीटबारीवर पहिल्या तीन दिवसात १६.६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या सहामाहीतला सर्वात मोठी ओपनिंग मिळवणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. याआधी ‘अमेझिंग स्पायडर मॅन २’लाही तितकाच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने सुरूवातीच्या तीन दिवसांत ११ कोटींचा पल्ला गाठला होता. आणि या चित्रपटाची केवळ भारतातील कमाई ५१ कोटी रुपये आहे. अगदी ‘एक्समेन’ च्या आधी प्रदर्शित झालेला ‘गॉडझिला’ चित्रपट दोन आठवडय़ानंतरही चित्रपटगृहांमधून उतरवलेला नाही. एकाचवेळी ८०० चित्रपटगृहातून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत २२.४० कोटी रुपये एवढी कमाई केली आहे. ‘कॅप्टन अमेरिका – द विंटर सोल्जर’नेही एकूण १७.७० कोटी रुपयांची कमाई केली.
तुलनेने बॉलिवूडपटांचे चित्र चांगलेच निराशाजनक आहे. गेल्या पाच महिन्यात प्रदर्शित झालेल्या बॉलिवूडपटांमध्ये के वळा चारच चित्रपट सुपरहिट ठरलेत. त्यातही ‘२ स्टेट्स’ या एकमेव चित्रपटाने कशीबशी १०० कोटीची धाव पार केली आहे. तर ‘रागिणी एमएमएस’ने ४२ कोटी रुपये, ‘क्वीन’ने ६१ कोटी रुपये तर ‘यारिया’ चित्रपटाने ४० कोटी रुपये एवढी कमाई केली आहे. आणि हे कमाईचे आकडेही देश-विदेशातील तिकीटबारीवर मिळून के लेल्या कमाईचे आहेत. बाकीच्या कित्येक चित्रपटांना सर्वसाधारण कमाईही करता आलेली नाही. याऊलट, हॉलिवूडच्या नामांकित कलाकारांचे चित्रपट नसतानाही इथे प्रदर्शित झालेल्या जवळपास प्रत्येक चित्रपटाला कोटीचा आकडा पार करता आला आहे.
गेल्यावर्षी ‘ग्रॅव्हिटी’ या हॉलिवूडपटाने इथे रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. त्यामुळे हॉलिवूडपटांसाठीची भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन त्याचवेळी हॉलिवूडपटांचे मोठे वितरक मानल्या जाणाऱ्या पीव्हीआर समूह, फॉक्स स्टार स्टुडिओ सारख्यांनी मोठय़ा प्रमाणावर हॉलिवूडपट इथे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यावर्षी कित्येक हॉलिवूडपट अमेरिकेत आणि भारातात एकाचवेळी प्रदर्शित करण्यात आले. वर्षांच्या सुरूवातीलाच प्रदर्शित झालेल्या ‘द लीजंड ऑफ हक्र्युलिस’ या चित्रपटाने ३.२० कोटी, ‘द हंगर गेम्स : कॅचिंग फायर’ने ५.२१ कोटी, ‘रिओ २’ चित्रपटाने ४.४३ कोटी रुपये, रसेल क्रोची मुख्य भूमिका असलेल्या ‘नोआ’ चित्रपटाने ३.५० कोटी रुपये तर ‘३००’ चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ‘३०० राईझ ऑफ अॅन एम्पायर’ या चित्रपटाने २८.५६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
हॉलिवूडपटांना इथे तिकीटबारीवर यश मिळण्यात बॉलिवूडपटांनी चांगलाच हातभार लावला आहे. बिग बजेट चित्रपटांना ईद आणि दिवाळीच्या तारखा शोधत बसायचे, पहिले सहा महिने जणू आपले नाहीतच अशापध्दतीने वावरणारे बॉलिवूडचे सगळे कलाकार नंतरच्या सहा महिन्यांतील तारखांसाठी एकमेकांशी भांडत बसतात. त्यामुळे तिकीटबारीवर फारसे मोठे आव्हानच नसल्याने हॉलिवूडपटांना कमाईसाठी वेळही मिळाला आणि अर्थात, बऱ्याचशा गाजलेल्या हॉलिवूडपटांचे सिक्वल आणि प्रीक्वल सुट्टीच्या दिवसांमध्ये प्रदर्शित झाल्याने त्यांना चांगली कमाईही करता आली. पुढच्या सहा महिन्यातही बॉलिवूडपटांबरोबरच आणखी काही चर्चेतले हॉलिवूडपट प्रदर्शित होणार आहेत. त्यावेळी तिकीटबारीवरची धम्माल अनुभवता येईल. मात्र, पहिल्या सहामाहीत बॉलिवूडमध्ये हॉलिूवड चांगल्या आकडय़ांनी उत्तीर्ण झाले असल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्याचे पडसाद येत्या काही वर्षांत बॉलिवूडवर नक्कीच उमटतील!
तिकीटबारीवर वर्चस्व हॉलिवूडपटांचे
दमदार बॉलिवूडपटांनी वर्षांची सुरूवात झाली तर प्रेक्षक त्यांच्याकडे पाठच फिरवतील की काय?, अशी जणू समजूत करून बॉलिवूडच्या मोठय़ा कलाकारांनी त्यांचे मोठे आणि यशस्वी होऊ शकतील
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 01-06-2014 at 12:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood dominans on box office