Israael-palestine war update : क्वेन्टिन टेरेन्टिनो या हॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला कोण ओळखत नाही. हॉलिवूडप्रमाणेच भारतातही टेरेन्टिनोचे बरेच चाहते आहेत. कायम हटके विषय आणि त्यांची वेगळ्याच पद्धतीची मांडणी यासाठी टेरेन्टिनो लोकप्रिय आहे. गुंतागुंतीची पटकथा आणि हिंसा हे टेरेन्टिनोचे दोन हुकमी एक्के. ‘पल्प फीक्शन’, ‘किल बिल’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’सारख्या दमदार चित्रपटांसाठी टेरेन्टिनो ओळखला जातो.

हॉलिवूडचा हा लोकप्रिय दिग्दर्शक सध्या चांगलाच चर्चेत आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त न होता टेरेन्टिनोने नुकतीच ‘इस्रायल डीफेन्स फोर्स (IDF)’ला भेट दिली व सैनिकांचे मनोबल वाढवले.

आणखी वाचा : लाल ड्रेसमधील तमन्ना भाटियाचा जबरदस्त हॉट अवतार व्हायरल; चाहते म्हणाला, “इतका हॉटनेस… “

‘इस्रायल वॉर रूम’च्या अधिकृत ट्विटर हँडच्या माध्यमातून क्वेन्टिन टेरेन्टिनोच्या भेटीचे फोटो व्हायरल झाले. ‘इस्रायल’च्या दक्षिण भागातील बेसला क्वेन्टिनने भेट दिली अन् सैनिकांचे मनोबल वाढवले. यावेळी फोटो घेण्यात आले, सैनिकांचे फोटो सुरक्षेसाठी लपवण्यात आले आहेत. याबरोबरच हमासच्या हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणांनाही क्वेन्टिनने भेट दिली.

क्वेन्टिन टेरेन्टिनो हा काही काळ इस्रायलची राजधानी तेल अविवमध्ये वास्तव्यास होता. चित्रपटाच्या एका प्रमोशन टूरदरम्यान त्यांनी तिथली स्थानिक इस्रायली गायिका डॅनिएला पिक हिच्याशी ओळख झाली व मैत्री झाली. पुढे २०१८ मध्ये या दोघांनी लग्नही केलं, त्यांना दोन मुलंही आहेत. इस्रायल शहर, तिथल्या लोकांचं आदरातिथ्य त्यांची आत्मीयता याबद्दल टेरेन्टिनोला फार अप्रूप आहे. तेल अविव हे शहर त्याला लॉस एंजेलीससारखं वाटतं.

क्वेन्टिनच्या या भेटीमुळे तो आता यावर चित्रपट काढणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. पण क्वेन्टिन टेरेन्टिनोने याआधीच याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे की तो कधीच राजकीय पार्श्वभूमीवर बेतलेले चित्रपट दिग्दर्शित करणार नाही. इतक्या तणावपूर्ण वातावरणातही इस्रायलमध्ये जाऊन तिथल्या जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना भेट देणाऱ्या या हटके हॉलिवूड फिल्ममेकरची सोशल मिडियावर चांगलीच प्रशंसा होत आहे.

Story img Loader