शाहरूखचा ‘डॉन २’ अवतार भलताच लोकप्रिय झाला होता. त्यानंतर ‘रा. वन’साठीही त्याने आपली केशरचना बदलली होती. आता पुन्हा एकदा स्वत:लाच नव्या रूपात पाहण्यासाठी शाहरूख आसूसला असून त्याच्या चेहऱ्याला नवा साज चढवण्यासाठी निर्मात्यांनी हॉलिवूडच्या रंगभूषाकाराला पाचारण केले आहे. ‘रईस’ या आगामी चित्रपटात शाहरूख वेगळ्या भूमिकेत दिसणार असून तो पहिल्यांदाच फरहान अख्तरबरोबर एकत्र काम करणार आहे. या चित्रपटात शाहरूखच्या व्यक्तिरेखेनुसार त्याला पूर्णत: वेगळ्या रूपात सादर करण्याची निर्मात्यांची इच्छा आहे.
‘डॉन २’ चित्रपटात शाहरूखचे लांब केस, पोनीटेल, वाढवलेली दाढी असा अवतार होता आणि त्याची रचना ही दिग्दर्शक म्हणून स्वत: फरहाननेच केली होती. एवढेच नव्हे तर त्याने चित्रपटात जी बंदूक वापरली होती त्याचीही रचनाकृती फरहानचीच होती. पण, ‘रईस’मध्ये फरहान शाहरूखबरोबर कलाकार म्हणून काम करणार आहे. त्यामुळे आता त्याच्या नव्या अवतारासाठी हॉलिवूडच्या नावाजलेल्या रंगभूषाकारांच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. कुठेही ‘प्रॉस्थेटिक मेकअप’चा वापर न करता त्याच्या चेहऱ्यात हे बदल करायचे आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत ही टीम शाहरूखबरोबर काम करण्यासाठी भारतात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘रईस’ चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल ढोलकिया यांचे असून त्यांनी या हॉलिवूडच्या टीमबरोबर चर्चा केली आहे. तपशीलही निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, सध्या शाहरूख ‘हॅप्पी न्यू इअर’च्या चित्रिकरणात व्यग्र असल्याने प्रत्यक्षात त्याच्याबरोबर काम करण्यासाठी मार्च महिना उजाडेल, असा निर्मात्यांचा अंदाज आहे. दोन टोळयांमधले युध्द हा ‘रईस’ चित्रपटाचा विषय असून गुजरातमध्ये याचे चित्रिकरण होणार आहे. शाहरूख पुन्हा एकदा खलनायकी व्यक्तिरेखेत दिसणार असून फरहान पोलिसाच्या भूमिकेत असल्याचे समजते.

Story img Loader