‘माव्‍‌र्हल’ सुपरहिरोपट हॉलीवूड सिनेसृष्टीतील सध्याचे चलनी नाणे. त्यांचे एकामागून एक प्रदर्शित होणारे चित्रपट तिकीटबारीवर कोटय़वधींची कमाई करत आहेत. गेल्या काही काळात त्यांनी प्रदर्शित केलेल्या जवळपास प्रत्येक सुपरहिरोने लोकप्रियतेची परमोच्च सीमा गाठली. परंतु त्याचबरोबर या सुपरहिरोंविरोधात उभ्या असलेल्या खलनायकांनी मात्र साफ निराशा केली आहे. माव्‍‌र्हलचे सुपरहिरो जितके जबरदस्त असतात, तितकेच त्यांचे खलनायक कमकुवत असतात, असा आरोप त्यांच्यावर वारंवार केला जातो. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’मधील ‘थॅनॉस’ हा एकमेव अपवाद वगळला तर खलनायकांच्या बाबतीत माव्‍‌र्हलची पाटी कोरीच आहे, असे म्हणता येईल. परंतु यावर तोडगा म्हणून त्यांनी आपले शक्तिशाली खलनायक पुन्हा एकदा एका नव्या अवतारात मोठय़ा पडद्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या नव्या प्रकल्पाची सुरुवात ‘मँडरीन’ या खलनायकापासून केली जाणार असल्याची माहिती ‘आयर्नमॅन – ३’ चे दिग्दर्शन शेन ब्लॅक यांनी दिली आहे. ‘मँडरीन’ हा माव्‍‌र्हल युनिव्हर्समधील सर्वात धोकादायक खलनायकांपैकी एक आहे. त्याची तोंडओळख ‘आयर्नमॅन – ३’ मध्ये करून देण्यात आली होती. कॉमिक्स कथानकांमध्ये दाखवण्यात आलेला मँडरीन हा आयर्नमॅनचा पारंपरिक शत्रू आहे. त्याच्याकडे १० जादूई अंगठय़ा आहेत. यातील प्रत्येक अंगठीमध्ये ‘इन्फिनीटी स्टोन’प्रमाणे विशेष शक्ती आहे. या अंगठय़ांमधील दुष्ट शक्तीच्या जोरावर मँडरीन एका दहशदवादी संघटनेची निर्मिती करतो आणि पाश्चात्त्य देशांमध्ये दहशदवादी कारवाया करू लागतो. त्याला थांबवण्याचा प्रयत्न आयर्नमॅन करतो. परंतु चित्रपटात दाखवण्यात आलेला मँडरीन कॉमिक्स कथानकांपेक्षा अगदी वेगळा आणि हास्यास्पद होता. त्यामुळे त्याच्यावर चाहत्यांमार्फत प्रचंड टीका करण्यात आली होती. मँडरीन विरुद्ध आयर्नमॅन हे कथानक कॉमिक्स व कार्टून मालिकेत विशेष लोकप्रिय ठरले होते. मात्र, चित्रपटात दाखवण्यात आलेल्या या खलनायकाने चाहत्यांच्या आशेवर पाणी फिरवले. शिवाय मँडरीनच नव्हे तर कॉमिक्समधील जवळपास प्रत्येक खलनायकाने चित्रपटांमधून निराशाच केली, परंतु आता या सातत्याने होणाऱ्या टीकेवर उपाय म्हणून मँडरीन व त्याच्या १० अंगठय़ांचे कथानक अगामी चित्रपटांमध्ये दाखवण्यात येईल, अशी माहिती शेन ब्लॅक यांनी दिली आहे.

Story img Loader