सिनेमा पाहताना किंवा पाहण्यासाठी निवडताना आपण निश्चितच काही अंतर्गत उपजत निकषांना कवटाळतो.  दर एक चित्रपट आपल्याला १०० टक्के मनोरंजन देऊ शकत नाही, कारण निवडलेल्या चित्रपटाने दीड-दोन तासांच्या कालावधीतील आपल्या मनातील अपेक्षित कसोटय़ांवर नेहमीच उतरणे अशक्य असते. चित्रपटाने एकाच वेळी दर्शकाच्या दृष्टिकोनातील साऱ्या भावभावनांना पोषण देणाऱ्या गोष्टी आणाव्यात आणि दृश्यीक, पटकथात्मक, अभिनयात्मक, संगीतात्मक घटकांतील सवोत्तम अनुभव सादर करावा, म्हणजे सिनेमा त्या वेळेपुरता प्रेक्षकाच्या मन:पटलावर नोंदला जातो. सिनेमाने ब्लॉकबस्टरसह कलात्मकही असावे आणि वेगासोबत संयत अवस्थाही दाखवावी अशा अनेक सर्वसामान्य दृष्टिकोनातून सिनेमाकडे रंजनशोधक पाहतात. भारतीय ‘सिनेरसिकां’ची विचारधारा या सर्व बाबींनीच शंभर वर्षे पोसली गेली असल्याने विशिष्ट कलाकारांचे चित्रपट शंभर कोटींचा व्यवसाय करतात तर अन्य बहुतांशांच्या माथी कितीही चांगला सिनेमा बनविला तरी अल्पदर्शकांचे ‘भाग्य’ लिहिलेले असते. कुणालाही साधी गोष्ट ऐकायची नसते तर ‘हटके’ अन् ‘आगळीवेगळी’च कथा पडद्यावर पाहायची असते. अमेरिकी चित्रसृष्टी आपल्याला जशी बिग-बजेटी, ब्लॉकबस्टरी, स्पेशल इफेक्ट्सनी नेत्रदीपक सिनेमांची कर्मभूमी म्हणून माहिती आहे, तशी प्रयोगशील सिनेमांची पुरस्कर्ती म्हणून कमी ज्ञात आहे. वितरणकृपेने आपल्याकडे तेथील बडय़ा स्टारकास्टचे आणि बरी तिकीटविक्री होऊ शकणारे सुपरमॅनी चित्रपट झळकतात. त्याहून चांगले चित्रपट असूनही इथल्या दर्शक विचारधारेच्या भीतीने आणलेच जात नाहीत. ही कोंडी गेल्या काही वर्षांत इंटरनेट, नेटफ्लिक्स युगामध्ये फुटू पाहत असल्याने आता मनोरंजन निवडीचे अगणित पर्याय निर्माण झाले असून प्रेक्षकांना ‘फार थोर’ आणि ‘फार साधा’ यापलीकडे मनरंजनाची पुरेपूर सेवा उपलब्ध करून देणाऱ्या आडवाटेच्या चित्रपटांची रांगच निर्माण झाली आहे. ‘फ्लोरिडा प्रोजेक्ट’, ‘लेडीबर्ड’ यांच्याइतकी मान्यता किंवा रेटिंग्ज मिळाले नसले तरी साधी गोष्ट मांडून त्या पंगतीत शिरकाव करणाऱ्या ‘प्लीज स्टॅण्ड बाय’ नामक चित्रपट हा त्या रांगेतला एक साजेसा सिनेमा आहे.

‘प्लीज स्टॅण्ड बाय’ चित्रपट पाहण्यासाठी नुसती मोठी स्टारकास्टही पुरेशी आहे. डकोटा फॅनिंग या अभिनेत्रीने आपल्या सात वर्षे वयातील पदार्पणातच ‘आय अ‍ॅम सॅम’ नावाच्या चित्रपटातून हॉलीवूडमध्ये नाव कमावले होते. एक चुरचुरीत बोलणारी आणि बेधडक वावरणारी ही मुलगी ‘अ‍ॅक्रोस द युनिव्हर्स’ या बिटल्सच्या गाण्याच्या एका उत्तम व्हर्शनमध्ये ज्यांनी पाहिली असेल (यू टय़ूबवर रूफस वेनराइटचे हे गाणे कित्येक वर्षे फक्त या छोटुकल्या मुलीसाठी पाहिले जाते.) त्यांना नुसती भलामण करण्यासाठी कित्येक वर्षे वापरले गेलेले ‘दैवी सौंदर्य’ या विशेषणाची खरी फोड करणे सहज जमेल. तर अनेक बालकलाकार मोठेपणी प्रेक्षकांच्या विस्मृतीचे धनी होतात. काहींनाच फक्त तारुण्यात झळकण्याचे नशीब मिळते. विशी उलटलेली डकोटा फॅनिंग त्या अल्पसंख्येत  मोडते. ‘प्लीज स्टॅण्ड बाय’ हा खरेतर तिचा एकपात्री सिनेमा आहे. टोनी कोलेट किंवा इतर सहकलाकारांची केवळ नावाला भर आहे.

मायकेल गोलामाको या अत्यंत तरुण नाटककाराच्या ‘प्लीज स्टॅण्ड बाय’ या नाटकावरून बेतलेल्या या चित्रपटाची तुलना आपल्याकडच्या पिकू किंवा मसान या नवसमांतर साधी गोष्ट सांगणाऱ्या चित्रपटांशी करता येईल. अर्थात या चित्रपटांमध्येही  गिमिकचा अंतर्भाव होता, पण ‘प्लीज स्टॅण्ड बाय’ गिमिकविरहित आहे. ‘आय अ‍ॅम सॅम’ या चित्रपटाशी याचे नाते जोडता येईल  कारण इथली नायिका वेण्डी (डकोटा फॅनिंग) ऑटिस्टिक आहे. सर्वसामान्यांप्रमाणे तिचा मेंदू काम करीत नसल्यामुळे ती जिथे असायला हवी तिथेच म्हणजे एका खासगी केअर सेंटरमध्ये राहते. आठवडय़ाचे कपडे घालण्यापासून ते खाणे-टीव्ही पाहणे आणि आनंद मिळविण्याचे तिचे सारे जगणे आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार चालते. स्टार ट्रॅक ही टीव्ही मालिका, पुस्तके आणि चित्रपटांची तिची माहिती अचूकता कुणालाही थक्क करणारी आहे. सिनेबॉन दुकानात तुटपुंजे काम करताना पॅरामाउण्ट पिक्चर्सने आयोजित केलेल्या ‘स्टारट्रेक’ पटकथा स्पर्धेत आपले लिखाण पोहोचविण्याचे तिचे छोटे उद्दिष्ट आहे. यातील निम्मा भाग तिने चित्रपटाची पटकथा पूर्ण करून पार पाडला आहे. आपली परिचारिका आणि मदतकर्ती  स्कॉटी (टोनी कोलेट) हिने पटकथा वाचून अभिप्राय देईपर्यंत स्पर्धेची तारीख उलटून जाणार असल्याने चार दिवस आधी वेण्डी केअरसेंटरमधून पळ काढते. तिचा एकटय़ाचा आत्मविश्वासाने होणारा प्रवास आणि तिची बहीण ऑड्री (अ‍ॅलिस इव्ह) व स्कॉटी यांचा काळजीने तिला शोधण्याचा प्रकार यावर हा चित्रपट बेतला आहे.  हा प्रवास उगाच अवघड, त्रासाचा आणि जाचाचा नाही, किंवा तिला संकटात पाडणारा नाही. तर तिच्यासह स्कॉटी आणि ऑड्री यांच्या मनोविकासात भर पाडणारा आहे. स्टारट्रॅकला समांतर वेण्डीच्या मनातील जग आणि तिच्या आयुष्याचे वास्तव यांचे मिश्रण करून चित्रपट पुढे सरकतो, तो आवडून जाण्यासाठी अनेक जागा बनवतं. चमकदार गोष्ट सांगणे कायम सोपे असते, पण साध्या गोष्टींतून परिणामकारकता साधणे नेहमीचकठीण असते. ‘प्लीज स्टॅण्ड बाय’ नेमकेपणे त्या निकषांवर खरा उतरतो.