आयर्विन वेल्श या स्कॉटिश लेखकाची ‘ट्रेन्स्पॉटिंग’ ही कादंबरी आणि त्याच नावाचा डॅनी बॉएल या दिग्दर्शकाने केलेला चित्रपट१९९०च्या दशकात जगभरात तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या व्यसनांध माणसांची मानसिकता स्पष्ट करणारा आहे. ट्रेन्स्पॉटिंगचा भर जरी ड्रग अॅडिक्टच्या नजरेतून जग दाखविण्यावर असला, तरी या कादंबरी आणि सिनेमाने आखून दिलेला व्यसनाविषयीचा सामाजिक-सांस्कृतिक आराखडा या काळात तयार होणाऱ्या विविध कलाकृतींमधून उमटत राहिला. चक पाल्हानिक यांची ‘फाइट क्लब’, ‘चोक’ , निक हॉर्नबी यांची ‘हाय फिडिलीटी’ (यात संगीत व्यसनांधांची मानसिकता सापडेल.) या ट्रेन्स्पॉटिंगउत्तर नवअभिजात कलाकृती मानवी मेंदूत घडणाऱ्या असामाजिकतेची बिजे दाखवून देणाऱ्या आहेत. व्यसनामुळे नैतिक-अनैतिक मूल्यांचा ऱ्हास झालेल्या, लादलेल्या एकारलेपणाची-नाकारलेपणाची शिकार बनलेल्या, सामाजिक संस्थांबद्दल- नातेसंबंधांबद्दल अढी निर्माण झालेल्या आजच्या छिन्नमनस्क अवस्थेतील पिढीजवळ आपल्या व्यसनाचा वटवृक्ष करण्यापलीकडे कोणताच पर्याय उरलेला नाही, हे या कादंबऱ्या-सिनेमांनी दाखवून दिले. तब्बल २० वर्षांनंतर ‘टी-टू ट्रेनस्पॉटिंग’ या चित्रपटाद्वारे डॅनी बॉएलने आधीच्या चित्रपटातील व्यसनांध व्यक्तिरेखांची आजची अवस्था चित्रित केली आहे. आयर्विन वेल्शच्याच पोर्नो या कादंबरीतील भाग आणि आधीच्या चित्रपटाच्या कथानकाचा धागा जोडून तयार झालेला व्यसनाचा हा वटवृक्ष गंमत, सूड, विडंबन, मैत्री, फसवणूक, गुन्हेगारी, हतबलता आदी विविध फांद्यांचे दर्शन प्रेक्षकाला घडवितो. कालसुसंगत साहित्य-चित्रपटनिर्मिती अनुभवण्याचा हा अव्वल नमुना आहे.
ट्रेन्स्पॉटिंग चित्रपटामध्ये सिकबॉय, रेण्टबॉय, स्पड आणि फ्रँको या व्यसनात बुडालेल्या चौघांनी अमली पदार्थ विक्रीचा एक मोठ्ठा घाट घातलेला होता. त्यातून मिळालेल्या १६ हजार पाऊंडांच्या थैलीचे मित्रांमध्ये वाटप न करता दगाबाजी करून देशाबाहेर पळून गेलेल्या रेण्टबॉय-मार्क (इवान मॅक् कग्रेगर) याचे अॅम्स्टरडॅममधून परतण्यातून या दुसऱ्या चित्रपटाची सुरुवात होते. २० वर्षांच्या पल्ल्यात व्यसन सोडल्यामुळे सुखासीन आयुष्य जगणारा मार्क आपल्या पश्चात घराजवळचे जग जराही बदलले नसल्याचे पाहतो. सिकबॉय-सायमन (जॉनी ली मिलर) वारशाने आलेला बार चालवतो. मात्र त्याचा प्रमुख उद्योग व्ॉरॉनिका या आपल्या मैत्रिणीसोबत धनाडय़ांच्या अडनिडय़ा अवस्थेतील फिल्म गुपचूप बनवून त्यांना भरपूर लुबाडण्याचा आहे. पूर्वीचे त्याचे व्यसन आता निष्णात कोकेनधारकात रूपांतरित झालेले आहे. स्पड-डॅनियल( इव्हेन ब्रेम्नर) हेरॉइनच्या व्यसनापाई आपले कुटुंब आणि नोकरी दोन्ही गमावून आयुष्य संपवण्याच्या बेतात आलेला आहे. तर फ्रँको-फ्रान्सिस(रॉबर्ट कार्लायल) तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी आचाट -आत्मक्लेशी उपायांनी तुरुंगातून पळून जाण्याचा उद्योग यशस्वीरीत्या पार पाडत आहे.
पहिल्या चित्रपटात एखाद्या कुटुंबासारखे असलेली ही चौकडी मार्कच्या विश्वासघातामुळे अधिकाधिक तुटून गेलेली, विखुरलेली आणि आपापली व्यसनशिखरे गाठताना दिसतात. मार्क हा स्पडला आत्महत्येपासून परावृत्त करतो. सिकबॉयला २० वर्षांनंतर पळविलेल्या पैशांतील वाटा देतो. फ्रँको मात्र तुरुंगातून पळून आल्यानंतर आपल्या कॉलेजवयीन मुलाला गुन्हेगारीची दीक्षा देण्याच्या मागे लागला असतो. मार्क परत आल्याचे कळताच त्याला मारून सूड उगविण्याचे नवे ध्येय त्याच्यापुढे तयार होते.
मार्कचे आगमन हे व्यसनसुधारणा किंवा सुखांतिकेच्या पातळीचे जराही नसते. सायमन आणि त्याची मैत्रीण व्हॅरोनिका यांना घेऊन तो पैसे लुबाडण्याचा गमतीशीर कार्यक्रम आखतो. शिवाय सामाजिक कामासाठी युरोपियन युनियनकडून मिळणाऱ्या बडय़ा रकमेच्या शून्य व्याजाच्या कर्जासाठी अर्ज करतो. अर्थात हेदेखील भलत्याच हेतूने.
व्यसनांधांच्या नजरेतून जग दाखविताना डॅनी बॉएलच्या ट्रेन्स्पॉटिंगमधील कॅमेरादेखील व्यसनांध माणसासारखा फिरताना दिसला होता. इथेही फार वेगळे नाही. पहिल्या चित्रपटात या व्यसनांधांच्या बाबतीत फटफजितीच्या जशा अनेक घटना घडल्या होत्या, तशाच एकाहून एक सुरस घटना आहेत. व्हायग्राचा अतिडोस घेऊन त्याचा वापर करण्यासाठी सज्ज असलेल्या फ्रँकला मार्क दिसल्यानंतर निव्वळ त्याला मारण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळावे लागण्याचा प्रकार, ही अवघड भेट सार्वजनिक स्वच्छतागृहासारख्या ठिकाणी घडविण्याचा घाट, धर्माच्या नशेत बुडालेल्या व्यक्तींना मार्क-सायमनकडून लुबाडण्याचा फसायला जाता जाता जमलेला उद्योग, गँगस्टरकडून मार्क-सायमनची विचित्र धिंड काढणारी शिक्षा, स्पडकडून लिहिल्या गेलेल्या कथेतील फ्रँकच्या पात्राला अतिवाईट रंगविलेले वाचून चवताळणाऱ्या फ्रँकचा त्रागा, २० वर्षांत कुटुंब-मुले असे सर्वमान्य आयुष्य जगल्याचे मार्कने सांगितल्यानंतर होणारा सायमनची असूयोत्तम अवस्था आणि ते सारे गमावले असल्याचे स्पष्ट 8केल्यानंतर बनत जाणारे सायमनचे सामान्यरूप व्यसन वटवृक्षाला सर्व बाजूंनी दाखवून देते.
टी-टू ट्रेन्स्पॉटिंग अर्थातच सुखांतिका नाही. या चित्रपटातही व्यसनात अडकलेल्या या सर्वच व्यक्तींना विश्वासघाताच्या, सूडाच्या नव्या फेऱ्यामधून जावे लागते. ज्याचा धागा पकडून योग आल्यास आणखी २० वर्षांनंतर सिनेमा करण्याची शक्यता डॅनी बॉएलने राखून ठेवली आहे. आपल्या भोवतीच्या दु:स्थितीला सामोरे जाताना या चित्रपटांमधील व्यक्तिरेखा ‘चूझ लाइफ’ या प्रसिद्ध स्वगताचा अंगीकार करताना दिसतात. आजच्या वर्तमान अवस्थेत कसल्या ना कसल्या व्यसनात किंवा छंदोव्यसनाने जखडलेल्या आपल्या प्रत्येकाचे प्रतिबिंब शोधले तर या दोन्ही चित्रपटांतील वेगवेगळ्या स्वगतात पाहायला मिळू शकेल. आपल्या व्यसनाचा भविष्यकाळ कसा असेल, हे सांगता येणार नसले तरी व्यसनाच्या वटवृक्षाची ही सावली अनेक बाजूंनी आपल्यासमोर आरसा धरणारी आहे. आपण त्यातून काय घेतो, ते सध्या खूप महत्त्वाचे आहे.