सध्याचा हॉलीवूड चित्रपट भव्य-दिव्यत्वाच्या आणि मनोरंजनाच्या अतिसोसाच्या नादामध्ये विस्मरणीय चित्रपटांची यादी वाढवत आहे. पण गंमत म्हणजे या चित्रसृष्टीतच इंडिपेण्डण्ट चित्रपट तयार करून तो महोत्सवामध्ये फिरविणारी उत्तमोत्तम समांतर चित्रपटांची यंत्रणाही तयार झालेली आहे. हे चित्रपट समीक्षकीय सिद्धांतांनुसार तिकीटबारीवर वाजत-गाजत नाहीत, पण महोत्सव, इंटरनेट आणि आता तयार होणाऱ्या कुटुंब मनोरंजनाच्या (होम एण्टरटेण्टमेण्ट) सर्व ठिकाणी आवडीने सवड काढून पाहिले जातात. दोन वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सच्या भारतीय वावराबाबत साशंक असणाऱ्यांना आता त्याहून अनेक पर्याय चित्रपट आणि जगभरच्या टीव्ही मालिकांसाठी उपलब्ध झाले आहेत. शहर- गावांतील अट्टल दर्शकांनी पायरसीच्या मार्गाला तिलांजली देत स्वस्तात उपलब्ध झालेल्या मनोरंजन पर्यायांना कवटाळायला सुरू केले आहे. नुकताच या पर्यायांपैकी एकावर दाखल झालेला ताजा चित्रपट ‘द लास्ट वर्ड’ पाहण्यात आला. पाहण्याची खोड ही दिग्दर्शक मार्क पेलिंग्टन यांच्या काही वर्षांपूर्वी पाहिलेल्या ‘हेन्री पूल इज हिअर’ नामक एका देखण्या फिलगुडी सिनेमाची स्मृती अद्याप ताजी असण्यामुळे झाली. ‘लास्ट वर्ड’बाबतचे कुतूहल या दिग्दर्शकाने गाठलेल्या नव्या पल्ल्याला शोधण्यातून आले होते. ‘हेन्री पूल इज हिअर’मध्ये अवकाळी मृत्यू येणार असल्याची डॉक्टरी वर्दी मिळालेला तरुण आपल्या जन्मगावी येतो. मृत्यूपूर्वीचे दिवस शांततेत घालविण्यासाठी आलेल्या या तरुणाच्या आयुष्यात भीषण कोलाहल तयार होतो. त्याच्या घरातील राहिलेल्या रंगकामामध्ये गावातल्या एका व्यक्तीला येशू ख्रिस्ताचा आकार दिसतो. सारे गाव त्याच्या घराभोवती गोळा होते आणि धर्माध गंमतींचा खेळ सुरू ठेवत चित्रपट दीड-दोन तास प्रेक्षकाला खिळवून ठेवतो. ‘द लास्ट वर्ड’ची सुरुवातही तिच्या मुख्य व्यक्तिरेखेला मृत्युचाहुलीच्या डॉक्टरी सल्ल्याने होते. पण कथानकाचा इथला बाज आणखी अनेक क्षेत्रांना कवेत घेतो.
चित्रपटाच्या आरंभीच भेटणारी हॅरिअट लौलर (शर्ली मॅकलेन) ही वृद्धा नक्की कोणत्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व आहे, हे संवादरहित असलेल्या प्रसंगातून कळू शकतं. जाहिरात क्षेत्रात उत्तुंगावस्थेत किंवा श्रीमंती शिखरावर असलेली हॅरिअट आपल्या भोवताली असणाऱ्या कुणाही व्यक्तीच्या कामातून सर्वोत्तम मागत असते. सर्वोत्तमाची तिची व्याख्या ही इतरांना न पटणारी असल्यामुळे घरातील माळी, खासगी वेशभूषाकार, खासगी स्वयंपाकी यांची कामेही ती स्वत:च सर्वोत्तमपणे करीत असते. तिच्या एकलकोंडय़ा, नवरा-मुलीपासून वेगळे असलेल्या आयुष्यात तिच्याशी चांगले बोलणारे कुणीच नसते. त्याची तमा न बाळगता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने स्वत:कडून दुसऱ्याला वाकविण्याइतपत आर्थिक, सामाजिक पत प्राप्त केलेली असते.
आयुष्यात उद्योगातील साऱ्या यशांची चव चाखणाऱ्या हॅरिअटला एका निर्णायक क्षणी स्थानिक वृत्तपत्रामधील कुणा व्यक्तीचा मृत्युलेख वाचायला मिळतो आणि आपला मृत्युलेख लवकरात लवकर आपल्याला हवा तसाच व्हावा या ध्यासाने ती पछाडते. मग तात्काळ ती वृत्तपत्राच्या संपादकाला गाठते. आपल्या कंपनीच्या जाहिरात ऋणांच्या ओझ्यात त्यालाही वाकविते. संपादक हॅरिअटची गाठ मृत्युलेख लिहिणाऱ्या अॅन शेरमन (अमाण्डा सायफ्रेड) या तरुणीशी घालून देतो. हॅरिअटने सांगितलेल्या कालावधीत मृत्युलेख लिहून देण्याचे काम अॅनला अवघड होऊन बसते. शहर-गावामध्ये ज्यांना ज्यांना अॅन हॅरियटविषयीच्या माहितीसाठी भेटते, ते तिच्याविषयी वाईटच बोलू लागतात. ठरलेल्या वेळेत हॅरिअटच्या मते आत्यंतिक टुकार मृत्युलेख लिहून झाल्यानंतर मग तो कसा असावा, याचा धडा हॅरिअट अॅनला शिकवण्यासाठी सज्ज होते. हॅरिअट ही अॅनसाठी अनुभवांची नवी खाण खुली करते आणि चित्रपट मृत्युलेखाच्या निमित्ताने दोघी एकमेकांचा मन:तळ शोधू लागतात.
‘द लास्ट वर्ड’ एक सहज-सुंदर फिलगुडपट आहे. त्यात उगाचच गिमीकी ड्रामेबाजी नाही, व्यक्तिरेखांचा कथानकासोबत विकास करण्याची इथली हातोटी हेन्री पूल इज हिअरसारखीच आहे. व्यक्तिरेखांनी स्वत:चा शोध घेऊन आयुष्यात हरविलेल्या क्षणांची पुनर्बाधणी करणाऱ्या कैक सकारात्मक चित्रपटांतील कथानकांसारख्याच काही घटकांना दिग्दर्शकाने येऊ दिले असले, तरी इथे ते दोषपूर्ण वाटत नाही. उलट तेच खूप गमतीशीर झालेले आहेत.
आजच्या पत्रकारितेतील काही तऱ्हेवाईक निरीक्षणे चित्रपटात तंतोतंत खऱ्या स्वरूपात अवतरली आहेत. भीतीने ग्रासलेल्या आणि मृत्युलेख लिहिण्याच्या लादलेल्या निष्णात कलेत स्वत:ला हवे ते हरवून बसलेल्या अमाण्डाची व्यक्तिरेखा खूप संशोधनातून उभी राहिली आहे.
विस्मरणीय चित्रपटांच्या हॉलीवूडी गर्तेत ‘लास्ट वर्ड’ त्यातल्या माफक मेलोड्रामाच्या ऐवजाने मन जिंकून घेणारा चित्रपट आहे. फिल गुड सिनेमांच्या सध्याच्या टंचाईत त्याचे असणे म्हणून महत्त्वपूर्ण आहे.