याचवर्षी एका न्यायालयीन खटल्याने साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. तो खटला म्हणजे हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि अभिनेत्री अंबर हर्ड यांचा घटस्फोट खटला. हा खटला चांगलाच गाजला. याचदरम्यान जॉनी डेप नव्या ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ या चित्रपटात कॅप्टन जॅक स्पॅरो या त्याच्या लोकप्रिय भूमिकेतून पुनरागमन करणार असल्याचा दावा काही लोकांनी केला होता. पण नुकतंच डिज्नीने या फ्रँचायझीचे पुढील भागांवरील काम बंद केल्याने जॉनी या मालिकेतील कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही हे स्पष्ट करण्यात आलं आहे.
जॉनीची पूर्वपत्नी आणि अभिनेत्री अंबर हर्ड हिने त्याच्यावर केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या आरोपानंतर या चित्रपट मालिकेतील नियोजित सहाव्या चित्रपटावरील काम थांबवण्यात आलं होतं. पण गेल्या आठवड्यात एका मीडिया रीपोर्टनुसार असा दावा करण्यात आला होता की मानहानीच्या प्रकरणात अंबरविरुद्ध जॉनीच्या विजयानंतर, डिस्ने या चित्रपटावर पुन्हा काम सुरू करणार आहेत, पण आता हा दावा खोटा असल्याचं उघडकीस आलं आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार एका सूत्राच्या माहितीप्रमाणे “जॉनी कॅप्टन जॅक स्पॅरोच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे आणि फेब्रुवारीच्या सुरूवातीस यूकेमधील एका गुप्त ठिकाणी याचं चित्रीकरण सुरू होणार आहे. अद्याप या प्रकल्पाशी निगडीत काहीच माहिती समोर आलेली नाही शिवाय दिग्दर्शकाचाही शोध सुरू आहे.” अशी माहिती समोर आली होती, पण डिज्नीकडून तूर्तास या प्रोजेक्टला स्थगिती दिल्याचं वृत्त समोर आलं आहे.
आणखी वाचा : “किचनचा दरवाजा लावून तो…” अजय देवगणच्या ‘या’ सवयीबद्दल काजोलचा खुलासा
जॉनी आणि अंबर यांचा घटस्फोट खटला बरेच दिवस चर्चेत होता. शिवाय यामध्ये जॉनीच्या विजयानंतर अंबरच्या हातूनही बरेच हॉलिवूड प्रोजेक्ट निसटल्याचं वृत्त समोर आलं होतं. आता जॉनी डेप पुन्हा त्याच्या अजरामर जॅक स्पॅरोच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या बातमीने त्याचे चाहते चांगलेच खुश झाले होते. गेले कित्येक दिवस ते जॉनीला या अवतारात पुन्हा बघण्यासाठी उत्सुक होते, या बातमीमुळे त्यांचा नक्कीच हिरमोड होऊ शकतो.