हॉलिवूडमध्ये अॅक्शन स्टार आणि चॉकलेट बॉय अशी प्रतिमा घेऊन वावरणारा टॉम क्रूझ हा सोशल मीडियावर बऱ्याचदा चर्चेत असतो. टॉम हा त्याच्या चित्रपटातील सगळे स्टंट स्वतः करतो आणि त्यासाठी त्याचं बरंच कौतुक होतं. ‘मिशल इम्पोस्सिबल’सारख्या चित्रपटांच्या सिरिजमध्ये त्याने केलेले स्टंट्स आजही पाहताना सामान्य प्रेक्षकांच्या मनात धडकी भरते. याचदरम्यान त्याने जगातील सर्वात उंच इमारत ‘बुर्ज खलिफा’च्या टोकावर बसून काढलेला फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.
आता परत टॉम अशाच एका स्टंटमुळे चर्चेत आला आहे. दक्षिण आफ्रिकेत शूटिंगदरम्यान एका चॉपरमधून उंचावरून उडी मारत टॉमने त्याच्या चाहत्यांसाठी खास मेसेज रेकॉर्ड केला आहे. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या टॉम तिथे ‘मिशन इम्पॉसिबल ७’चं चित्रीकरण करत आहे.
आणखी वाचा : “हा आपला मूर्खपणा…” अभिनेते, गीतकार पियुष मिश्रा यांची बॉलिवूडच्या दिग्दर्शकांवर सडकून टीका
व्हिडिओमध्ये टॉम एयरक्राफ्टच्या कोपऱ्यावर बसला आहे जे फार उंचावर आहे आणि टॉम त्याच्या मनातील भावना शेअर करत आहे. तो म्हणाला, “सध्या आम्ही दक्षिण आफ्रिकेत ‘मिशन इम्पॉसिबल ७’च्या भाग १ आणि २ च्या चित्रीकरणात व्यस्त आहोत. यावर्षाचा शेवट तुम्हा सगळ्यांचे आभार मानल्याशिवाय नसता झाला. त्यामुळे ‘टॉप गन : मॅवरिक’ला तुम्ही जे प्रेम आणि पाठिंबा दिलात त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो.”
यानंतर टॉमने उडी मारायची तयारी केली आणि त्यानंतरही तो कॅमेराच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत होता. त्याने पुन्हा त्याच्या चाहत्यांचे मनापासून आभार मानले. टॉमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांनी त्याच्या या धाडसाचं प्रचंड कौतुक केलं आहे. “वय म्हणजे या माणसासाठी केवळ एक आकडा आहे.” असं काही चाहत्यांनी या व्हिडिओखाली कॉमेंट करत म्हंटलं आहे.
“हे खरंच अविश्वसनीय आहे. एयरक्राफ्टमधून उडी मारताना माणूस इतका शांत कसा असू शकतो?” असा सवालही काही चाहत्यांनी केला आहे. ‘मिशन इम्पॉसिबल ६’च्या दरम्यान असाच एक स्टंट करताना टॉमला चांगलीच दुखापत झाली होती, पण तरी अजूनही तो सगळे स्टंट स्वतःच करणं पसंत करतो. तब्बल ३ दशकं चाहत्यांचं ‘मिशन इम्पॉसिबल’ या सिरिजमधून मनोरंजन करणारा टॉम क्रूझ आता याच्या पुढच्या भागावर काम करत आहे. हे दोन्ही भाग २०२३ आणि २०२४ यावर्षात प्रदर्शित होणार आहेत.