हॉलीवूडमधील स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड-अमेरिकन फेडरेशन ऑफ टेलिव्हिजन अँड रेडिओ आर्टिस्ट्स (एसएजी-एएफटीआरए) यांच्या संपामुळे मनोरंजन उद्योग हादरला होता. एसएजी-एएफटीआरएनं स्टुडिओशी तीन वर्षांच्या कालावधीसाठी तात्पुरता करार केल्याने आता ११८ दिवसांनंतर हा संप संपुष्टात आला आहे. कामगारांनी जास्त पगाराची मागणी केल्यामुळे हॉलीवूड कलाकारांनी या वर्षीच्या दोन संपांपैकी दुसऱ्या संपाचं निराकरण करण्यासाठी मोठ्या स्टुडिओशी तात्पुरता करार केला. कामाची खराब परिस्थिती आणि कमी वेतन यामुळे असोसिएशननं संप जाहीर केला होता.
एसएजी-एएफटीआरए टीव्ही/नाट्य समितीने ८ नोव्हेंबर रोजी एकमताने करार मंजूर केला. १० नोव्हेंबर रोजी हा करार मंजुरीसाठी युनियनच्या राष्ट्रीय मंडळाकडे जाईल. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, मध्यस्थांनी अलायन्स ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स (एएमपीटीपी) सोबत नवीन प्राथमिक करार केला होता. हे वॉल्ट डिस्ने, नेटफ्लिक्स आणि इतर मीडिया कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते.
या नवीन निर्णयाचा अर्थ असा आहे की, हॉलीवूड अखेरीस मे नंतर पहिल्यांदाच अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण क्षमतेने सुरू होतील. हॉलीवूड रिपोर्टरच्या मते, युनियन अजूनही कराराचे काही तपशील जाहीर करणार आहेत, जे येत्या काही दिवसांत समोर येतील.
विश्लेषण : हॉलीवूडचे लेखक संपावर का गेले?
कमी मोबदला आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) उद्भवलेल्या धोक्यामुळे अनेक लेखकांनी जुलै महिन्यामध्ये नोकरी सोडली होती. त्यानंतर हजारो चित्रपट आणि टेलिव्हिजन कलाकारांनी या लेखकांना पाठिंबा देऊन काम बंद केलं होतं.
तात्पुरत्या करारामध्ये काय समाविष्ट आहे?
युनियननं सदस्यांना दिलेल्या मेसेजमध्ये सांगितलंय की, या कराराचे मूल्य १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. त्यात वेतनवाढ, स्ट्रीमिंग सहभाग बोनस आणि एआयबाबतच्या नियमांचा समावेश आहे. तात्पुरत्या करारामध्ये आरोग्य आणि पेन्शन निधीमध्ये जास्त गुंतवणूक, बॅकग्राऊंड परफॉर्मर्ससाठी भरपाई इत्यादी तरतुदींचा समावेश आहे.