Hollywood writers strike : हॉलीवूडमध्ये टेलिव्हिजन आणि चित्रपटासाठी काम करणारे लेखक संपावर गेल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळेच तिथे रात्री उशिराचे लागणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले असून त्याऐवजी त्या कार्यक्रमांचे रिपीट टेलिकास्ट सुरू करण्यात आले आहे. ‘Writers Guild of America’च्या तब्बल ११५०० लेखकांनी हा संप पुकारला असून त्यांच्या मागण्या त्यांनी मांडल्या आहेत.
हॉलीवूडमधील मोठमोठे स्टुडिओज आणि प्रॉडक्शन कंपन्या आणि निर्मात्यांच्या विरोधात हा संप पुकारल्याचे स्पष्ट झाले आहे. आपले वेतन वाढवून मिळण्यासाठी अमेरिकेतील हे लेखक रस्त्यावर उतरले आहेत. युनिव्हर्सल, पॅरामाऊंट, डेस्नी, नेटफ्लिक्स, अॅपल अशा मोठमोठ्या स्टुडिओजकडे लेखकांनी ही मागणी केली आहे.
आणखी वाचा : ‘TDM’चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचं धक्कादायक विधान; म्हणाले, “आता…”
लेखकांना फ्रीलान्सर्सप्रमाणे मानधन दिले जाते, त्यामुळे त्यांना ठोस अशी रक्कम कधीच कोणत्याही स्टुडिओ किंवा निर्मात्यांकडून मिळत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. यावर एक तोडगा काढावा, अशी मागणी या लेखकांनी केली आहे. हे फ्रीलान्स काम थांबवून लेखकांना एक ठोस मिळकतीची सोय करून देण्यात यावी यासाठी यांनी हा संप पुकारला आहे.
याबरोबरच हॉलीवूडमध्ये कथालेखनासाठी बऱ्याच ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा- म्हणजेच सिरी, अॅलेक्सा- यांचा वापर केला जात असल्याचा दावाही या लेखकांनी केला आहे. ‘एआय’ एका चित्रपट किंवा टेलिव्हिजन लेखकाची जागा कधीच घेऊ शकत नाही. त्यामुळे याचा वापर पूर्णपणे थांबवला पाहिजे, अशी मागणीही लेखकांनी केलेली आहे. २०२१ मध्येही या लेखकांनी असाच एक संप केला होता जो तब्बल १०० दिवस चालला होता. आता हा संप नेमका कधी मिटतोय आणि लेखकांच्या मागण्या मान्य होणार की नाही हे येणारा काळच ठरवेल.