दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचे देशभरात चाहते आहेत. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जाते. नुकतंच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ज्युनिअर एनटीआरचे आणि त्याच्या कामाचे कौतुक केले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह हे सध्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी प्रसिद्ध अभिनेता ज्युनिअर एनटीआर आणि ‘रामोजी फिल्मसिटी’चे रामोजी राव यांची भेट घेतली. या भेटीनंतर अमित शाहांनी ट्वीट करत एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगणा दौऱ्यादरम्यान अभिनेता ज्युनिअर एनटीआरची भेट घेतली. ही भेट हैदराबादमध्ये झाली. या भेटीनंतरचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत ते दोघेही एकमेकांशी काही ठराविक विषयांवर चर्चा करताना दिसत आहे.
Video : मुंबईत पत्नीसह मनसोक्त फिरताना दिसला प्रसिद्ध क्रिकेटपटू, तुम्हाला ओळखता येतंय का?
अमित शाहांनी या भेटीचे फोटो शेअर करताना त्याला छान कॅप्सनही दिले आहे. त्यात त्यांनी ज्युनिअर एनटीआरचे कौतुक केले आहे. “हैदराबादमध्ये तेलुगू सिनेसृष्टीतील एक अतिशय प्रतिभावान अभिनेता आणि तेलुगू चित्रपटसृष्टीचा हिरा असलेल्या ज्युनिअर एनटीआरची हैदराबाद भेट घेतली. त्याच्यासोबत छान संवादही साधला.”
तर रामोजी राव यांच्यासोबतचे फोटो शेअर करताना ते म्हणाले की, “श्री रामोजी राव यांचा जीवन प्रवास अतुलनीय आहे. विविध चित्रपट उद्योग आणि माध्यमांसंबंधित लाखो लोकांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. आज मी त्यांची हैदराबाद येथील निवासस्थानी भेट घेतली.” या दोन्हीही दिग्गजांच्या भेटीचे फोटो अमित शाहांनी स्वत:च्या ट्विटरवर शेअर केले आहेत.
अमित शाह आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या भेटीने राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमित शहा हे केंद्रीय राजकारणातील महत्त्वाचे व्यक्ती आहेत. तर ज्युनियर एनटीआर हा चित्रपटसृष्टीतील अनुभवी कलाकार आहे. या दोन दिग्गजांच्या भेटीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोला ५० हजाराहून अधिक लाइक्स पाहायला मिळत आहे. तर १२ हजारांहून अधिक लोकांनी हा फोटो रिट्वीट केला आहे. अनेकजण यावर कमेंट करत प्रतिक्रिया देतानाही दिसत आहे.
दरम्यान अभिनेता ज्युनियर एनटीआर २००९ पासून टीडीपी नेते किंवा इतर पक्षांच्या नेत्यांसोबत दिसलेला नाही. त्याने राजकारणाऐवजी त्याच्या चित्रपट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचे वडील नंदामुरी हरिकृष्ण हे २००८ ते २०१३ पर्यंत टीडीपीचे राज्यसभा सदस्य होते. त्याचे काका आणि अभिनेते नंदामुरी बालकृष्ण हे आंध्र प्रदेशातील टीडीपीचे आमदार आहेत. त्यामुळे आता ज्युनिअर एनटीआर राजकारणात सक्रीय होणार का? असा प्रश्न या भेटीनंतर उपस्थित होत आहे. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.