सध्या तरुणाईमध्ये कोणाची चर्चा सर्वात जास्त असेल तर तो आहे, ‘हनी सिंग’. तुम्ही त्याचे चाहते असाल किंवा टीकाकार  त्याला तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाहीत हे मात्र नक्की. अगदी त्याच्याच भाषेत सांगायचे झाले तर, ‘सध्या माझे टीकाकारच माझ्याविषयी इतकं बोलत आहेत, जणू तेच माझे चाहते झाले आहेत.’ त्याने जेव्हा ‘स्टार प्लस’वर नवीन रिअ‍ॅलिटी शोची घोषणा केली तेव्हा कित्येकांच्या भुवया ऊंचावल्या होत्या. पण नाही म्हणता येत्या २४ ऑगस्टपासून ‘रॉस्टार’ हा त्याचा शो टीव्हीवर दाखल होणार आहे. गेली कित्येक र्वष संगीतावरचा रिअ‍ॅलिटी शो म्हणजे हमखास टीआरपी हे ठरलेले समीकरण होते. पण हळूहळू हे शोज टीव्हीवरून अदृश्य होण्यास सुरुवात झाली आणि त्याची जागा डान्स आणि इतर रिअ‍ॅलिटी शोजनी घेतली. या शोच्या निमित्ताने रिअ‍ॅलिटी शोच्या साच्यातील काही गोष्टींमध्ये बदल करण्यात आले आहेत, त्यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप.
पाश्र्वसंगीताकडून रॉकस्टार या संकल्पनेवर दिलेला भर
संगीताचा रिअ‍ॅलिटी शो म्हटलं की, तीन परीक्षक, एक सूत्रसंचालक आणि समोर हिंदी चित्रपटांमधील जुनी गाणी पुन्हा पुन्हा गाणारे स्पर्धक असे साधारण चित्र डोळ्यांसमोर उभे राहते.आता बऱ्याच अवधीनंतर पुन्हा एकदा संगीताचा रिअ‍ॅलिटी शो टीव्हीवर येत असताना त्यात गजेंद्र सिंगचे नाव नसेल तर आश्चर्यच. ‘रॉस्टार’च्या माध्यमातून ते एक नवीन रिअ‍ॅलिटी शो घेऊन दाखल झाले आहे. या शोबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत भारतात गाण्यावर आधारित शो म्हटले की, पाश्र्वगायक शोधण्याकडे कल दिला जात असे. अर्थात त्याला कारणही तसेच होते. आपल्याकडे संगीत म्हणजे बॉलीवूड हे समीकरण बनलेले आहे. चित्रपटाशिवाय स्वतंत्र अल्बम, स्टेज शोच्या माध्यमातून गायक मिळू शकतात, हे आम्हाला लोकांना पटवून द्यायचे होते. त्यातून या शोची निर्मिती झाली.’’ कलाकारांच्या गायनावरच नाही तर त्यांच्या सादरीकरणावरही भर देण्यात येणार आहे. त्यासाठी खास जगप्रसिद्ध कोरियोग्राफर ‘मिशेल श्वानड्ल’ला पाचारण केले आहे.
या कार्यक्रमात हनी सिंगची भूमिका नक्की काय याबद्दल अनेक तर्क लावले गेले होते. ‘‘मी या स्पर्धेत परीक्षक नसून त्यांच्या मित्राच्या भूमिकेत आहे. मी त्यांना शोदरम्यान मदत करेन, सूचना देईन, पण त्यांच्यातील योग्य रॉकस्टारला निवडण्याची संपूर्ण जबाबदारी लोकांच्या हाती असेल. आज मला लोक एक यशस्वी गायक म्हणून ओळखतात, पण या पदावर पोहचण्यासाठी मला दहा र्वष संघर्ष करावा लागला होता. तो या कलाकारांना करावा लागू नये हा आमचा प्रयत्न आहे. ते उत्तम गायक आहेत, त्यांच्यातील कित्येकजण उत्तम संगीतकारही आहेत. ते स्वत:ची गाणी स्वत: लिहितात. थोडक्यात सांगायचे तर त्यांच्यात मी दहा वर्षांपूर्वीचा हनी सिंग पाहात आहे. हा शो झाल्यावर यांच्यातील प्रत्येकासोबत एका स्वतंत्र अल्बमवर काम करायची माझी इच्छा आहे.’’ असे हनी सिंगने सांगितले.  
स्पर्धकांऐवजी कलाकार ही संकल्पना
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे नेहमीच्या गाण्यांच्या स्पर्धामध्ये पाहायला मिळणारे शिकाऊ स्पर्धक तुम्हाला येथे पाहायला मिळणार नाहीत. देशातून दहा स्पर्धकांची निवड केली असून प्रत्येकाची गायक, संगीतकार म्हणून स्वतंत्र कारकीर्द चालू आहे. ‘‘आम्हाला स्पर्धक आणि परीक्षक हे विभाजन करायचे नव्हते. इथे त्यांना रॉस्टारपासून ते रॉकस्टार बनवण्याच्या प्रवासात मदत करण्यात येणार आहे,’’ असे स्टार प्लसचे आशीष गोलवरकर यांनी सांगितले.
ऑनलाइन ऑडिशन्स करणारा पहिला शो
ऑडिशन म्हटले की स्पर्धकांच्या रांगा, ताटकळणारे स्पर्धक हे चित्र डोळ्यांसमोर येते. या शोसाठी पहिल्यांदा ऑनलाइन ऑडिशन्सचा प्रयोग करण्यात आला आहे. इच्छुकांना त्यांच्या गाण्याच्या चित्रफिती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. आमच्यासाठी हे स्पर्धक नसून कलाकार होते, त्यामुळे त्यांना लांबच लांब रांगांमध्ये उन्हात ताटकळत ठेवणे पटण्यासारखे नव्हते. म्हणून ही संकल्पना अमलात आणण्याचे, स्टार प्लसचे जनरल मॅनेजर गौरव बॅनर्जी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा