भयहास्यपटांची मालिका सुरू करण्याचं आणि लोकप्रिय करण्याचंही श्रेय निर्माते दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सकडे जातं. ‘स्त्री’ आणि ‘भेडिया’ या दोन्ही चित्रपटांचे विषय वेगळे असले तरी त्यातला भयहास्यपटाचा धागा जपण्यात दोन्ही वेळा निर्माता-दिग्दर्शकद्वयीला यश आलं होतं. ‘मुंज्या’ हा त्यांचा या मालिकेतला तिसरा चित्रपट आणखी एका दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठीत ‘फास्टर फेणे’, ‘झोंबिवली’, ‘उनाड’ सारखे विविधांगी चित्रपट देणाऱ्या आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. आपल्या नेहमीच्या शैलीबाहेर जात ‘मुंज्या’च्या माध्यमातून सरपोतदार यांनी केलेला भयहास्यपट दिग्दर्शनाचा प्रयत्न बऱ्यापैकी जमून आला आहे.
‘मुंज्या’ पाहताना ‘स्त्री’ आणि ‘भेडिया’ या दोन चित्रपटांचा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही. त्याचं कारण हे तिन्ही चित्रपट भयहास्यपटांच्या जातकुळीतले आहेत. इथे पडद्यावर गोष्ट पाहताना मनात भयही दाटलं पाहिजे आणि त्यातल्या गमतीने त्याही अवस्थेत चेहऱ्यावर हसू फुटलं पाहिजे. शिवाय, ‘स्त्री’मध्ये भुताचा चेहरा दाखवण्यापेक्षा तिच्या अस्तित्वाच्या कल्पनेतूनच भय निर्माण केलं होतं. ‘भेडिया’मध्ये नायकाचं रूपांतर होतं. ‘मुंज्या’मध्ये एक पाऊल पुढे जात सीजीआयचा वापर करून बनवलेली भुताची आकृती आपल्याला प्रत्यक्ष खेळ घडवताना दिसते. त्यामुळे साहजिकच चित्रपटाचा प्रभाव प्रेक्षकांवर कसा पडेल यात फरक नक्कीच पडतो. दृष्टिआड असलेल्या गोष्टींचं भय अधिक छळतं, इथे मात्र मुंज्या सतत समोर दिसतो, साहजिकच त्याच्या अस्तित्वामुळे कथेतल्या पात्रांच्या मनावर होणारा परिणाम, असाहाय्यता, मृत्यूचं भय या सगळ्या अजब मिश्रणातून कथेतला खेळ रंगणार. मात्र ‘मुंज्या’सारख्या भयहास्यपटामध्ये विनोदाची मात्राही चुकवून चालत नाही. या दोन्हीचा तोल साधताना दिग्दर्शकाची झालेली कसरत चित्रपट पाहताना जाणवते.
हेही वाचा >>>ऐश्वर्या नारकर पन्नाशीच्या नसून ‘इतकं’ आहे वय, जन्मतारीखच सांगितली; कोकणातलं गाव कुठलं अन् कुठे राहतात? जाणून घ्या
कोकणात प्रचलित असलेल्या मुंज्याच्या दंतकथेचा आधार घेत चित्रपटाची कथा रचण्यात आली आहे. गोट्या नावाच्या मुलाचं त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुन्नीवर प्रेम आहे. मुन्नीचं लग्न ठरलं आहे. गोट्याच्या मनातून मुन्नीचा विचार काढून टाकण्यासाठी त्याची आई त्याची मुंज करते. मात्र मुन्नी त्याच्या मनातून जाण्याऐवजी तो तिला मिळवण्यासाठी काळ्या जादूचा आधार घेतो. या प्रयत्नात अकाली मृत्यू पावलेला गोट्या स्वत:च मुंज्या होतो. या मुंज्याचं भूत चुलत बहिणीच्या लग्नासाठी गावात आलेल्या बिट्टूच्या (अभय वर्मा) मानेवर बसतं. मुंज्याच्या भीतीने गलितगात्र झालेला बिट्टू, त्याला यातून बाहेर पडण्यासाठी मदत करणारा त्याचा पंजाबी मित्र, बिट्टूची पंजाबी आई (मोना सिंग) आणि त्याला कणखर बनवणारी त्याची आजी (सुहास जोशी), बिट्टूचं जिच्यावर प्रेम आहे ती बेला (शर्वरी वाघ) अशी एकेक पात्रं या गोष्टीत दाखल होत जातात, त्यातून मुंज्याची गोष्ट रंगत जाते.
कोकणात झालेलं चित्रीकरण, मराठी घरात घडणारी गोष्ट असल्याने एक से एक चांगले मराठी कलाकार आणि उत्तम व्हीएफएक्सच्या माध्यमातून मुुंज्यासह गोष्ट रंगवण्याचा केलेला प्रयत्न या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र आधी उल्लेख केल्याप्रमाणे या चित्रपटातलं भय अधिक असावं की विनोद यात पटकथेच्या स्तरावरच गोंधळ आहे. शिवाय, मुंज्याचं भूत सतत समोर दिसत असल्याने त्यातलं रहस्य किंवा भीती वाढवावी यासाठी काही गुंतागुंत निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला नाही. जो काही परिणाम आहे तो आवाजाच्या माध्यमातून आणि ठरावीक दृश्यचौकटींच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मुंज्याची आकृती ही ‘लॉर्ड ऑफ द रिंग’ या चित्रपटातील गोलमची आठवण करून देणारी आहे. बिट्टूला दिलेला हॅरी पॉटरशी साधर्म्य राखणारा लूक चांगला जमून आला आहे. अभय वर्मा या तरुणाने बिट्टूची भूमिका खूप सहजपणे रंगवली आहे. शिवाय, पंजाबी आईचा मराठी मुलगा त्याने संवादातूनही जपला आहे. सुहास जोशींनी साकारलेली गोड आजी इथेही भाव खाऊन जाते. मोना सिंग, कटप्पाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले दाक्षिणात्य अभिनेते सत्यराज यांचा एल्विस करीम प्रभाकर, अजय पूरकर यांचा बाळूकाका, भाग्यश्री लिमयेची रुक्कू अशा कलाकारांचा त्यातही मराठी कलाकारांचा टक्का अधिक असल्याने त्यांच्या सहज अभिनयाने या चित्रपटात खरी मजा आणली आहे. चित्रपटात गाण्यांचा मारा नाही, त्यातल्या त्यात ‘तैनू खबर नही’ हे गाणं श्रवणीय झालं आहे. बाकी सगळा खेळ पार्श्वसंगीताचा आहे. भयहास्यपट करण्याचा उत्तम प्रयत्न दिग्दर्शकाने केला असला तरी या मालिकेतील आधीच्या दोन चित्रपटांचा विचार करता ‘मुंज्या’ याहून अधिक प्रभावी करता आला असता हेच ठळकपणे जाणवतं.
मुंज्या
दिग्दर्शक – आदित्य सरपोतदार
कलाकार – अभय वर्मा, शर्वरी वाघ, सुहास जोशी, मोना सिंग, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे.