आपल्याकडच्या सर्वच हॉरर टीव्ही मालिकांचा (किंवा मालिकांमधील हॉरिबल क्षणांचा) मुलाधार ‘जम्प स्केअर’ नामक भीतीपटांतील लोकप्रिय संकल्पनेत आहे. प्रेक्षक किंवा दर्शक समोर घडत असलेल्या दृश्यांबाबत निवांत असताना त्याला दचकविण्यासाठी अचानक अंगावर येईलशा किंकाळ्या, दृश्यमारा किंवा भीतीदायक वाद्यांचा कर्कश्य ध्वनी वापरून ‘जम्प स्केअर’ची कला साधली जाते. ‘आहट’ नावाच्या भारतातील आद्य भीतीमालिकेत याचा चपखल वापर असायचा. नंतर सर्वसाधारण विषयांच्या सर्व भाषिक मालिकांमध्ये भीतीरस इतका वाढायला लागला की सासू-सुनांच्या कारनाम्यांमध्येही दचकविणाऱ्या गोष्टी ढॅण.कर्कश स्वरासह हजर राहून ‘जम्प स्केअर’ साधला जाऊ लागला. नव्वदोत्तरीच्या जगभरच्या भीतीपटांमध्ये कमी दाखले असलेल्या या प्रकाराचा वापर ‘फाऊंड फुटेज’ हॉरर या सिनेप्रकारांमध्ये उत्तम होऊ लागला. कॅमेरामध्ये नोंद होणाऱ्या ‘जम्प स्केअर’च्या गोष्टी जरी चित्रकत्र्र्याच्या दृष्टीने बेतीव असल्या, तरी त्या दर्शकाला मात्र चकविणाऱ्या आणि त्यांच्या मनातील भीतीक्रेंद्राला उद्युक्त करणाऱ्या ठरतात. गेल्या दोन दशकांमध्ये भीतीदायक सिनेमांमध्ये राक्षसी चेहऱ्यांचे महत्त्व लोप पावून त्याऐवजी पडद्यावर न दिसणाऱ्या अमानवी शक्तींनीच अधिक भयानुभव प्रेक्षकांना दिले. ‘ब्लेअर विच प्रोजेक्ट’पासून ते गेल्या वर्षी आलेल्या ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’पर्यंत या प्रकारच्या उत्तम भीतीपटांची भलीमोठी यादी करता येईल. पण फाऊंड फूटेज फिल्म्सची सद्दी वाढत असताना ‘जम्प स्केअर’चाच आधार घेऊन भीतीचा देखणा प्रयोग करणारे दोन उत्तम सिनेमे अलीकडे येऊन गेले. अमेरिकी इंडिपेण्डण्ट चित्रकर्त्यांच्या पथकातून वर आलेल्या डय़ुप्लास ब्रदर्सपैकी मार्क डय़ुप्लास याचे लेखन आणि अभिनय असलेल्या ‘क्रीप’ सिनेमाचे दोन्ही भाग ‘चुकवू नये’ या गटांत मोडणारे आहे. नेटफ्लिक्स यंत्रणेद्वारे त्याचे वितरण झाल्यानंतर आज या सिनेमांची चर्चा जगभर पोहोचली आहे.
‘क्रीप’चा पहिला भाग हा संपूर्णपणे ‘जम्प स्केअर’ या तंत्राने सजविण्यात आला आहे. यात दोनच पात्र आहेत. आरून (पॅट्रिक ब्राइस) हा व्हिडीओग्राफर आणि त्याला आपला व्हिडीओ संदेश चित्रित करण्यासाठी बोलावणारा जोसेफ (मार्क डय़ुप्लास). आपण दुर्धर आजारामुळे मरायला टेकलो असून आपल्या होणाऱ्या मुलाला आणि पत्नीला सांगण्यासाठी खास संदेश टिपण्यासाठी आरूनला बोलावले जाते. मात्र जोसेफच्या भेटीपासूनच त्याच्या विचित्र वागण्यामुळे आरूनपासून ते हा चित्रपट पाहणारे प्रेक्षक दचकायला लागतात. जोसेफ आरूनला जंगलातील घरात नेतो, तेथे त्याच्या वागण्यातील विचित्रपणाला आणखी धार येते. पुढे आरूनला घरात आलेल्या एका फोनद्वारे जोसेफ सांगत असलेल्या सर्व गोष्टी खोटय़ा असल्याचे आणि तातडीने तेथून पळ काढण्यासाठी सावध केले जाते. चित्रपटात अर्धकच्च्या स्वरूपात जेसनचा तथाकथित पत्नी-मुलीचा संदेश चित्रित झाला असतोच, त्यात आरूनला जोसेफकडून दिल्या जाणाऱ्या भीतीझटक्यांची भर पडते. आरून आपल्या घरी परततो ते भीतीआजाराने ग्रस्त होऊन. जोसेफ त्याचा पाठलाग सुरूच ठेवतो आणि परिणामकारक ‘जम्प स्केअर’ हजर व्हायला लागते.
क्रीप जिथे संपतो, त्याच्याच शेवटाचा आधार घेऊन क्रीप-२ सुरू होतो. त्या शेवटाची चित्रफीत डेव्ह (करण सोनी) नावाच्या व्यक्तीकडे पोहोचविली जाते. डेव्ह ती चित्रफीत पाहतो. तेव्हाच त्याचा मित्र आरून (आधीच्या मालिकेतील जोसेफ आपले नाव बदलून) दाखल होतो. डेव्हच्या चेहऱ्यावर चित्रफीत पाहून तयार झालेले भीतीभाव कॅमेरामध्ये नोंदले गेलेले असतात. अन् थोडय़ाच वेळात डेव्हची आरूनकडून थंड डोक्याने हत्या होते. त्यानंतर मागील सिनेमासारखीच कथेची नवी आवृत्ती होते. यात आरूनला नवे सावज सापडते सारा (डेझर आखोवन) नावाची व्हिडीओग्राफर. कॉलेजमध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी यूटय़ूबवर आपल्या धाडसव्हिडीओंना अपलोड करीत असते. आरूनची एक दिवसाच्या चित्रीकरणासाठी भल्या रक्कमेची जाहिरात पाहून ती त्याला संपर्क करते. आरून तिला ‘मी सीरिअल किलर असून एकोणचाळीस हत्या आजवर केल्या आहेत. चोवीस तासांत माझे चित्रीकरण करून जगाला माझ्याबद्दलची माहिती जगाला करून देण्यासाठी तुला बोलावले आहे.’ हे स्पष्ट आणि थंड डोक्याने सांगतो. विविध धाडसांना परिचित असलेली सारा ही बाब गमतीने नेत चित्रीकरणास मंजुरी देते आणि त्यातही आपल्या यूटय़ूबवर फारशा लोकप्रिय नसलेल्या मालिकेचा फायदा शोधू पाहते. पण आरूनचे सीरियल किलर असल्याचा बाता खऱ्या आहेत, हे कळेस्तोवर सारा नव्या जंजाळात अडकून पडते. क्रीपच्या दोन्ही भागांतील भीतीची मात्रा भयपट सातत्याने पाहणाऱ्यांना फार मोठय़ा चवबदलीचा आनंद देणारी आहे. भूत किंवा अमानवी शक्तींपेक्षा मानवी मनोविकारांची पातळी किती दहशत मनावर माजवू शकते, याचे विवेचन दोन्ही सिनेमांमधून करण्यात आले आहे. पहिल्या भागात जोसेफचे आरूनच्या दरवाज्यावर आगंतुक येऊन दहशत माजविण्याचा प्रसंग, दुसऱ्या भागातील धाडसी साराचे कारनामे आणि चित्रपटाच्या शेवटापर्यंतचे अनपेक्षित धक्के हे या चित्रपटांचे न विसरता येणारे घटक आहेत. फाइंड फुटेजच्या सततच्या माऱ्याला किंवा अलीकडे पारंपरिक भीतीसाधनांनी अतिउग्र बनत भयमजा घालविणाऱ्या सिनेमांना कंटाळला असाल, तर या दोन चित्रपटांमधला प्रायोगिक भयधक्का सलग पचविण्याची गरज आहे. आपल्या मनोबलाची परीक्षा पाहणारा या मालिकेतील तिसरा भाग येण्याआधी ते जमवता आले, तर बरेच.