प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांचा आज वाढदिवस. ७५ वर्षीय अमोल पालेकर हे चित्रकला आपले पहिले प्रेम असल्याचे सांगतात. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून पद्व्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर कारकिर्दीची सुरुवात त्यांनी चित्रकार म्हणूनच केली होती. चित्रकलेचे शिक्षण घेऊन चित्रकार झालो, योगायोगाने अभिनेता झालो, गरजेमुळे निर्माता झालो आणि स्वत:च्या आवडीमुळे दिग्दर्शक झाल्याचे ते नेहमी म्हणतात.
चित्रपट स्वीकारण्याबाबत अतिशय चोखंदळ असल्याने १९७० च्या दशकात अमोल पालेकर बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले. त्याकाळात बासू चॅटर्जी आणि अमोल पालेकर ही जोडी खूप गाजली. कॅमेऱ्याच्या मागेदेखील त्यांनी तेवढीच कमाल दर्शवली. ‘आकृत’, ‘थोडा सा रूमानी हो जाए’, ‘दायरा’, ‘कैरी’, ‘पहेली’ इत्यादी चित्रपट आणि ‘कच्ची धूप’, ‘नकाब’, ‘मृगनयनी’सारख्या दूरचित्रवाणीवरील मालिकांच्या दिग्दर्शनामध्ये त्यांनी आपले दिग्दर्शनातील कसब दाखवून दिले.
मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या अमोल पालेकर यांनी काही काळ बँकेतदेखील नोकरी केली. पालेकर कुटुंबियांचा दूरान्वये चित्रपटसृष्टीशी संबंध नव्हता. त्यांचे वडील पोस्टात कामाला होते, तर आई खासगी कंपनीत नोकरी करत होती. पदवी प्राप्त केल्यानंतर अमोल पालेकर यांनी आठ वर्षे ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरी केली. सुरुवातीचे तीन चित्रपट ‘सिल्व्हर ज्युबली’ हिट झाल्यानंतर आपल्याला नोकरी सोडणे सोपे झाल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
असे जुळले अभिनयाशी नाते
पालेकरांच्या गर्लफ्रेण्डला नाटकांमध्ये रस होता. जेव्हा ती नाटकांचा सराव करायची, तेव्हा अमोल पालेकर तिची वाट पाहात बाहेर उभे राहायचे. याचदरम्यान सत्यदेव दुबेंची नजर त्यांच्यावर पडली. दुबेंनी त्यांना मराठी नाटक ‘शांतता कोर्ट चालू आहे’ मध्ये पहिल्यांदा भूमिका दिली. या नाटकाला खूप पसंती मिळाल्याने दुबेंनी त्यांना अभिनयाचे प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला. पुढच्या नाटकासाठी त्यांनी अमोल पालेकरांना कठोर प्रशिक्षण दिले आणि अशाप्रकारे त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.
सुरुवातीपासूनच अमोल पालेकर प्रसिद्धीपासून दूर राहाणारे आहेत. स्वाक्षरी देण्यासाठीदेखील ते नकार देत असत. यासाठी त्यांना छोट्या मुलीकडून ओरडादेखील मिळत असे.