श्वास या सिनेमातला लहान मुलगा आठवतोय का? बरोबर अश्विन चितळे त्याचं नाव. हा अश्विन चितळे आता श्वासमधला चिमुरडा राहिलेला नाही. तर तो विविध प्रकारच्या भाषांचा अभ्यास करणारा अभ्यासक झाला आहे. फारसी भाषा त्याच्या आयुष्यात कशी आली आणि रुमी या फारसी कवीचा प्रभाव त्याच्या आयुष्यावर कसा पडला हे त्याने मित्रम्हणे च्या मुलाखतीत उलगडलं आहे. भाषा आणि त्यातले शब्द त्यामागे दडलेले अर्थ हे कशा प्रकारे आपल्याला शिकवत जातात हे अश्विन चितळेने सांगितलं आहे. सौमित्र पोटेने घेतलेल्या मुलाखतीत अश्विनने त्याचा विविध भाषा शिकण्याचा हा प्रवास कसा झाला ते सांगितलं आहे.
वेगळं काहीतरी करायचं म्हणून इंडॉलॉजीचा कोर्स केला
मला लहान असल्यापासूनच इतिहास आणि भूगोल आवडत होता. शाळेत जो इतिहास शिकवतात त्या पलिकडे गोष्टी असतात. मला त्यात रस जास्त होता. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, भाषा हे विषय मला आवडू लागले. मी इंडॉलॉजी एक कोर्स केला. त्यामध्ये मानवाच्या उत्पत्तीपासून १२ व्या शतकापर्यंत काय काय घडलं हे सगळं त्यात येतं. सुरुवातीला मी पुरातत्वशास्त्रात पदवी घेईन असं ठरवलं होतं. आर्कियोलॉजीत खूप सायन्स आहे असं मला वाटलं त्यामुळे तिकडे वळलो नाही. पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे त्यांचा इंडॉलॉजी हा कोर्स आहे, तोच मी केला. त्यात काही अभ्यासक्रम असतो. जो सगळ्यांनाच एकाच पद्धतीने शिकायला लागलो.
मात्र या कोर्समुळे काय झालं तर काळ या संकल्पनेकडेच मी एका वेगळ्या पद्धतीने बघायला लागलो. इतिहास म्हटलं की डोळ्यासमोर येतं घटना शिका, अमक्या राजाने अमक्याला मारा, मंदिर पाडलं हेच शिकायला मिळतं. पण टाइम या गोष्टीबाबत मला जास्त आकर्षण वाटू लागलं. प्रत्येक माणूस आणि निसर्गातला प्रत्येक घटक वेगवेगळ्या घटकांमध्ये वेळ या गोष्टीबरोबर रिअॅक्ट करते. वेळ ही अशी काही गोष्ट नाही ते इल्युजन आहे असं मला वाटतं असं अश्विन चितळेने म्हटलं आहे.
न्याय दर्शन हा प्रकार मला खूप भावला
इंडॉलॉजीमध्ये जो अभ्यासक्रम आहेत त्यात नऊ दर्शनं आहेत त्यात न्याय दर्शन हा एक प्रकार आहे. मला त्यात खूप रस वाटला. चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन असे प्रकार आहेत मला त्यात न्याय दर्शन यात जास्त रस वाटला. एक प्रकारचा वाद, त्याला प्रतिवाद कसा घातला जातो यात माझी रुची वाढली. पुण्याचे संस्कार होतेच. दुसऱ्याला मुद्दा सकारात्मकरित्या कसा पटवून द्यायचा याची उत्तरं मला यात मिळाली. त्यामुळे मला तत्त्वज्ञानात जास्त रस वाटला. त्याच दरम्यान मी वारसा सहलीही नेऊ लागलो. न्याय दर्शनमुळे मी फिलॉसॉफीसाठी एस. पी. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तत्त्वज्ञान शिकू लागलो. त्यावेळी एक भाषा शिकावी असंही वाटू लागलं. दहावीत असताना मी जॅपनिज भाषा शिकलो होतो. १२ वीमध्ये असताना जर्मन शिकलो होतो. पण ते विचारांनी काही शिकलो नव्हतो. लोक फ्रेंच, रशियन, चायनीज शिकतात मला ते शिकायचं नव्हतं. मग ज्या उरलेल्या भाषा होत्या आणि ज्या पुण्यात शिकवल्या जात होत्या त्यातली एक फारसी भाषा होती. इंडॉलॉजीचा कोर्स केल्याने मला हे माहित होतं की मध्ययुगीन काळात फारसी नाणी, लेख हे होते. नवं शिकायला मिळणार यासाठी मी उत्सुक होतो. फारसी ही इराणमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. फारसी आणि संस्कृत किती जवळचे आहेत? फारसी म्हणजेच पारसी, पारशी हे काहीही माहित नव्हतं. मी फक्त शिकायचं म्हणून गेलो. मी फारसी शिकू लागलो असंही अश्विन चितळेने सांगितलं आहे.
फारसी आणि रुमी हे अश्विनच्या आयुष्यात नेमके कसे आले?
अश्विन पुढे म्हणतो, भाषा शिकण्याच्या दोन पद्धती असतात एक असतं त्या भाषेचं व्याकरण शिका जे डोक्यात ठेवायचं शब्दांचा वापर करुन तुम्ही भाषा बोलू शकता. दुसरी पद्धत मी अवलंबली की जास्तीत फारसी कवींच्या कविता मी वाचू लागलो. भाषेतले बारकावे कळावेत म्हणून मी हे करु लागलो. हुशंग इप्तहा नावाचे एक कवी आहेत, ते आपल्या कुसुमाग्रजांसारखे होते. शब्द कळत होते पण शब्द कळतात हे कळत नव्हतं. हा अनुभव मला फारसीने दिला. त्यानंतर मी मराठीकडेही त्याच दृष्टीकोनातून पाहू लागलो. मराठीतही अनेक फारसी शब्द आले आहेत तो आणखी एक वेगळा मु्द्दा आहे. फारसी भाषेतले दोन कवी मला आवडले एक आहे रुमी आणि दुसरा आहे उमर खय्याम. हे दोन कवी विचारांनी परस्पर विरुद्ध होते. रुमी अध्यात्माकडे जाणारा तर उमर खय्याम एक हजार वर्षांपूर्वी झालेला गणित तज्ज्ञ होता. त्यांनी दोनशे वगैरे प्रकारच्या रुबाईयाँ लिहिल्या आहेत. ज्याला मराठीत आपण चार ओळी म्हणतो त्या. रोज एक गझल घ्यायची आणि वाचून काढायची अर्थ समजून घ्यायचा. मागच्या पाच वर्षात असा एकही दिवस गेला नाही की मी फारसी कविता किंवा गझल वाचली नाही. त्याच्या नोट्स काढल्या. काही छंदात बसल्या काही नाही. साधारण १००८ गझलांवर मी हे लिहून काढलं. त्यावर आता काहीतरी केलं पाहिजे हे मनाने घेतलं. मग मी घरात ते शब्द घेतले. एखाद्या गोष्टीच्या खोलात शिरुन जे करायचं होतं ते मी केलं असंही अश्विनने सांगितलं.
फारसी भाषेचा तिरस्कार करणारे गृहस्थ आणि उलगडलेलं कारण
फारसी ही भाषा मध्ययुगात वापरली गेली. शिवाजी महाराज पेशवे, मुघल यांच्या काळातली पत्रं आहेत त्यात फारसी शब्द आहेत. एक गृहस्थ आहेत माझ्या ओळखीचे त्यांना फारसी येतं त्यांना खूप राग आहे फारसी भाषेचा असंही मी ऐकलं होतं. त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो. सुरुवातीला विषय काढला नाही पण माझ्या हातावरचा फारसी टॅटू पाहून त्यांनीच विषय काढला. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की मी अमक्या अमक्या राजाची फर्मानं वाचून फारसी शिकलो आहे. त्याक्षणी मला हे कळलं की यांना फारसी का आवडत नाही, कारण त्या फर्मानांमध्ये कुणाला तरी मारा, हे पाडा असं सगळं लिहिलं असल्यामुळे त्यांना भाषेचाही दुस्वासच तयार झाला. मात्र मी कविता वाचल्याने, गझल वाचल्याने शब्द कळले, त्यांचं सौंदर्य कळलं आणि मला त्यातला गोडवाही कळला असं अश्विनने सांगितलं. मी भाषेतून रुमीकडे पोहचलो आणि मग मला समजलं की रुमी हा सेलिब्रिटी होता.
उर्दू भाषा मिसळीसारखी
या सगळ्यात उर्दू भाषाही मी बोलू लागलो. उर्दू काय आहे तर ती मिसळ आहे. फारसी, अरेबिक, संस्कृत, हिंदी अशा सगळ्या भाषांचं मिश्रण उर्दूत आहे. उर्दूत आहेत फारसीत सापडणार नाही. पण फारसी शब्द उर्दूत नक्की सापडतील. मी जे भाषांतर केलं ते याच उर्दू भाषेत केलं. फारसी वाचल्याने मला उर्दू कळायलाच लागलं. फारसी शायरी वाचल्यानंतर उर्दू सोपं झालं. हाफिज नावाचा कवी आहे फारसीतला तो कवितांमधून मुल्ला मौलवींना टोमणे मार, भाष्य कर अशा शैलीत व्यक्त होणार आहे. शब्द ही रत्न आहेत हे सगळं या भाषांच्या सौंदर्यामुळे कळतं असंही अश्विनने सांगितलं.
रुमीच्या १००८ गझलांचं उर्दूत भाषांतर
रुमीच्या १००८ गझला मी उर्दूत भाषांतरित केल्या आहेत. त्यावर मी एक ७० मिनिटांचा विशेष कार्यक्रमही करतो. मला रुमी का आवडला कारण मला तो रिलेट झाला. एक इश्क ए हकिकी, एक मिजाजी.. माझ्या दृष्टीने विचाराल तर रुमी असे प्रकार करणार नाही. कारण त्याला फक्त प्रेम माहित आहे. पण मिजाजीपासून तो जशा प्रकारे हकिकीकडे वळतो ते मी पाहिलेलं नाही. रुमी हा एक मौलाना होता, तो धर्मगुरु होता. शम्स नावाचा एक फकीर होता तो रुमीच्या आयुष्यात आला तेव्हा त्याचं आयुष्य बदलून गेलं. त्यामुळे शब्दांमध्ये अडकलेला रुमी शब्दांच्या पलिकडे गेला. मला रुमी सुरुवातीला पटला नाही पण हे लक्षात आलं की तो त्याच्या काळाला सुसंगत बोलत होता. त्यामुळे झालं असं की कुठलाही धर्म, पंथ मला चुकीचा वाटला नाही असंही अश्विनने म्हटलं आहे. रुमीच्या गझला वाचून दाखवू लागलो. रुमीचं शम्सचं कनेक्शन हे सगळं मला आवडलं. तुकोबा, ज्ञानेश्वर हे तर आयुष्याचा भाग आहेत. पण एका वेगळ्या भाषेतला माणूस शब्दांच्या माध्यमातून कळतो त्यात एक वेगळी गंमत आहे असं मला वाटतं असंही अश्विन चितळे यांनी म्हटलं आहे.
एकदा फारसीचं भूत डोक्यावर चढलं की उर्दूची चेटकीण काही वाटत नाही
उर्दू आणि गालिब वगैरे कडे मी कसा वळलो याचंही उत्तर अश्विनने दिलं. फारसी भाषा शिकल्याने मी उर्दू वाचू लागलो आणि समजू लागलं. एकदा फारसीचं भूत डोक्यावर चढलं की उर्दूची चेटकीण काही वाटत नाही. आजूबाजूचे उर्दू, उर्दू करतात, पण ती अनेक भाषांमधली एक भाषा आहे आणि ती छान भाषा आहे. यात काही दुटप्पीपणा करताना दिसतात, डबल स्टँडर्ड दिसतात. उर्दू जर उच्चारांसाठी पुजायची असेल तर मराठीचीही तशीच पूजा केली पाहिजे असंही मला वाटतं. अनेकांना उर्दू लिपी कशी लिहायची हे माहित नाही. उर्दू बोलणं हे हिंदी बोलण्यासारखं आहे. ते बोलणं विशेष नाही. कुठल्या नजाकतीत ती बोलता ते महत्त्वाचं आहे असं अश्विन सांगतो. इकबाल, आमीर खुस्रो, गालिब हे सगळं मी वाचू लागलो. गालिब आधीही वाचला होता, काही प्रमाणात. गालिब हा डिस्टर्ब माणूस होता असं मला वाटतं. रुमीमध्ये जास्त बुडलो तर तो आपल्या कुठल्या कुठे घेऊन जाईल. गालिबचं तसं नाही तो तुम्हाला निराश करतो. आपला काही उपयोगच नाही या लेव्हलवर गालिब आणतो. एक तर तो खूप भारी कवी आहे किंवा खूप डिस्टर्ब माणूस होता असं मला वाटतं. गालिबचं फारसी लिखाण हे त्याच्या उर्दू लिखाणापेक्षा पाचपटीने जास्त आहे. स्वतः गालिबनेच म्हटलं आहे मला समजून घ्यायचं असेल तर माझं फारसी साहित्य वाचा. ते सगळं वाचायला घेतलं. गालिबचं फारसी लिखाण वाचलं. फारसी ही भाषाच इतकी सुंदर आहे की तुम्ही तिच्या प्रेमात पडतच जाता असंही अश्विन चितळेने सांगितलं.