बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेला ‘ब्रह्मास्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. ट्रेलरपासूनच या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. बॉयकॉट ट्रेण्डमध्ये अडकूनही बॉक्स ऑफिसवर ‘ब्रह्मास्र’ची चित्रपटाची जादू पाहायला मिळाली. हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. आता चित्रपटातील कलाकारांनी घेतलेल्या मानधनाबद्दल चर्चा रंगली आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित बिग बजेट ‘ब्रह्मास्र’साठी रणबीर कपूरने मानधन घेतले नसल्याची चर्चा होत आहे. अयान मुखर्जीने यावर भाष्य करत खुलासा केला आहे. रणबीरला या प्रश्नाचं उत्तर द्यायला कदाचित आवडणार नाही. पण मी याबद्दल बोलू इच्छितो, असं म्हणत अयानने ‘ब्रह्मास्र’साठी रणबीरने घेतलेल्या मानधनाबाबतीतील सत्य सांगितले. रणबीर कपूरने ‘ब्रह्मास्र’साठी मानधन घेतले की नाही या प्रश्नाचं उत्तर देताना अयान म्हणाला, “’ब्रह्मास्र’ चित्रपटामागे अनेकांची मेहनत आणि त्याग आहेत. या चित्रपटासाठी एका आघाडीच्या अभिनेत्याने जितके मानधन घेतले असते, त्या तुलनेत रणबीरने कमी मानधन घेतलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण याशिवाय चित्रपट बनूच शकला नसता”.

हेही वाचा >> Video : “चित्रपट प्रदर्शित झाला, पैसे मिळाले…”, ‘त्या’ कृतीमुळे आलिया-रणबीर ट्रोल, व्हिडीओ व्हायरल

अयानने दिलेल्या उत्तरामुळे रणबीर कपूरने ‘ब्रह्मास्र’ चित्रपटासाठी शून्य रुपये मानधन घेतले की एका स्टार अभिनेत्याने या बिग बजेट चित्रपटासाठी जितके मानधन घेतले असते तितके त्याने घेतलेले नाही, हे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे रणबीर कपूरने स्वत:च या प्रश्नाचं उत्तर दिलं. तो म्हणाला “मी मानधन घेतले की नाही हा तुमचा प्रश्न आहे. खरं तर मी मानधन घेतले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी मी एक आहे. मी खूप पुढचा विचार करतोय. ‘ब्रह्मास्र’च्या पहिल्या भागासाठी मी मानधन घेतलेले नाही. परंतु, ब्रह्मास्रचे तीनही भाग खूप कमाई करतील, असा मला विश्वास आहे. माझ्या मानधनापेक्षाही ती कमाई खूप जास्त असेल”.

हेही वाचा >> “मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला”, तनुश्री दत्ताचा खळबळजनक खुलासा, म्हणाली “माझ्या गाडीचे ब्रेक फेल करुन…”

‘ब्रह्मास्र’ चित्रपटासाठी आलियाने घेतलेल्या मानधनावरही अयान मुखर्जीने भाष्य केले. तो म्हणाला “ आलियाने तिच्या भूमिकेसाठी फारच कमी मानधन घेतलं आहे. २०१४ मध्ये आलिया या चित्रपटाच्या टीममध्ये आली. त्यावेळी तिचे काहीच चित्रपट प्रदर्शित झाले होते. आता ती एक आघाडीची अभिनेत्री आहे. परंतु, आलियाने २०१४ मध्ये जे मानधन ठरले होते, तेवढेच घेतले आहे”.

Story img Loader