बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या बहुप्रतिक्षीत ‘सुलतान’ चित्रपटाच्या टीझरमध्ये आपण सलमान हरियाणवी भाषा बोलत असल्याचे पाहिले. सलमानचा हा हरियाणवी बाज पाहून समाजमाध्यमांमध्ये चित्रपटाच्या टीझरची चांगलीच चर्चा झाली. हरियाणवी भाषा बोलणे तसे सलमानला सहजशक्य झाले, पण चित्रपटाचा नायक असल्यामुळे हरियाणवी भाषा बोलताना संवादांचे उच्चारण उद्दामपणाकडे झुकलेले वाटू नये यासाठी खास काळजी घेण्यात आली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणवी भाषेत काही शब्द उच्चारताना ते उद्धटपणाकडे झुकणारे वाटतात, पण त्या शब्दांमागचा खरा उद्देश मूळात तसा नसतो. त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते. हरियाणवी बोलताना चित्रपटातील आपली भूमिका उद्दाम नायकासारखी वाटावी, असे सलमानला नको होते. सलमानची भूमिका एका माचो मॅन प्रमाणेच आहे, पण त्याचवेळी प्रेक्षक त्या भूमिकेच्या प्रेमातही पडले पाहिजेत, असा उद्देश होता. त्यामुळे हरियाणवी भाषा बोलताना चित्रपटातील नायकाच्या प्रतिमेला धक्का देतील असे शब्द वगळण्यात आले.
सलमानने हरियाणवी भाषा बोलण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले आणि तेही अगदी कमी कालावधीत. काही लहान चुका होत्या. मात्र, त्या त्वरित सुधारण्यात देखील आल्या. चित्रीकरणाला येण्याआधीच सलमान आपल्या संवादाची पूर्ण तयारी करून येत असे आणि केवळ चित्रीकरणावेळीच नाही, तर सेटवर देखील तो हरियाणवी भाषेत इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असे. संपूर्ण चित्रीकरणाच्या कालावधीत सलमान सेटवर हरियाणवी भाषेतच बोलत असे. सलमानसोबतच अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कुमूद मिश्रा या चित्रपटात हरियाणवी भाषा बोलताना पाहायला मिळणार आहे.

Story img Loader