बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्यानंतर या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ‘झुंड’ या चित्रपटात फुटबॉलच्या टीममध्ये असलेले सहकलाकार हे पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहेत. त्यांची ही टीम नेमकी कशी तयार झाली? त्या टीमला निवडण्यामागे काय विचार होता? या प्रश्नाचे उत्तर नागराज मंजुळे यांनी दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागराज मंजुळे यांनी नुकतंच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झी मराठीवरील मस्त मजेदार किचन कल्लाकार या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांच्या ‘झुंड’ चित्रपटातील संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होती. यावेळी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने ‘झुंड’ चित्रपटातील ही संपूर्ण टीम नेमकी कशी तयार झाली? याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी हा संपूर्ण किस्सा सांगितला आहे.

यावेळी नागराज मंजुळे म्हणाले, “झुंड हा चित्रपट मुळात नागपूरच्या लोकांवर आधारित आहे. त्यामुळे जेव्हा मी त्याची पटकथा लिहित होतो, त्यावेळी विजय बारसे आणि इतर त्यांचे विद्यार्थी यांच्या वर्णनानुसार मी ते लिहिले. त्यावेळी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे ही सर्व मुलं नागपुराती बिघडलेल्या आणि टपोरी भाषा बोलणारी आहेत. त्यांचे पात्र मी लिहित होतो. तेव्हा असे लक्षात आले की, जर याला कोणी न्याय देऊ शकत तर ती नागपूरची मुलंच असतील.”

“त्यानंतर आम्ही दीड ते दोन महिने नागपुरात होतो. माझा भाऊ, माझा मित्र त्या ठिकाणी राहून तशाप्रकारच्या मुलांचा शोध घेत होतो. कधी दुपारी, तर कधी संध्याकाळी आम्ही एखाद्या गल्लीत जाऊन, झोपडपट्टीत, पाण्याच्या टाकीजवळ अशा ठिकाणी त्या मुलांचा शोध घ्यायचो. एकदा अशाच वस्तीत आम्ही शिरलो. तेव्हा तिकडे काहीजण मस्ती करत असल्याचे आम्हाला दिसले. त्यावेळी माझ्या भावाने त्यांना विचारले की ऑडिशन देणार का? असे ऐकल्यानंतर ते शांत झाले”, असे नागराज मंजुळेंनी सांगितले.

“सलमान खान फार बदलला आहे अन् त्याच्यामते मी…”, संजय लीला भन्साळींचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How the team formed in the amitabh bachchan jhund movie nagraj manjule told the whole story behind the scenes nrp