बाहुबली प्रभासच्या आगामी ‘साहो’ सिनेमात श्रद्धा कपूरनंतर आता मंदिरा बेदीची वर्णी लागली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मंदिरा बेदी मोठ्या पडद्यापासून काहीशी दुरावली होती. त्यामुळे तिला थेट ‘साहो’मधील भूमिका कशी काय मिळाली, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, खुद्द मंदिरानेच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मंदिरा म्हणाली की, ‘साहोचे दिग्दर्शक मला सोशल मीडियावर फॉलो करतात. तसेच वर्कआउट आणि फिटनेसच्या माध्यमातून ते मला भेटतातही. इन्स्टाग्रामवर मी शेअर केलेले सर्व फोटो त्यांना आवडले. हे फोटो पाहूनच त्यांनी मला या सिनेमासाठी विचारले. आता इतक्या सहजपणे साहोमध्ये काम करायची संधी मिळाल्यामुळे अनेकांना मंदिराचा हेवाही वाटत असेल. मंदिराचा हा अनुभव ऐकून एखाद्याला विशिष्ट संधी मिळायचीच असेल तर ती कुठेही आणि कशीही मिळते, असेच म्हणावे लागेल.

‘अमिताभ तुम्ही काहीही करु नका, फक्त गप्पा मारा’- शबाना आझमी

‘साहो’ सिनेमाबद्दल सांगताना मंदिरा म्हणाली की, ‘मला या सिनेमाशी निगडीत एका कास्टिंग डायरेक्टरचा फोन आला होता. त्याच्या तीन दिवसांनंतर मी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटली. या भेटीत त्यांनी मला सिनेमाचा विषय सांगितला. सिनेमाचा विषय तर मला आवडलाच होता, याशिवाय हा एक मोठा प्रोजेक्ट असल्याने मी लगेचच त्यांना होकार देत करारावर स्वाक्षरीही केली. ‘साहो’मध्ये मंदिरा बेदी एका गँगस्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराने सिनेमातील काही दृश्यांचे चित्रीकरणही केले आहे.

‘साहो’ सिनेमात प्रभाससह श्रद्धा कपूर, मंदिरा बेदी, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे आणि नील नितीन मुकेश यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाचे चित्रीकरण अबुधाबी, मुंबई, हैदराबाद आणि रोमानिया या ठिकाणीही केले जाणार आहे. प्रभासनेही यापूर्वीच सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने याबाबतची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली होती. ‘बाहुबली’च्या अफाट यशानंतर प्रभासचा ‘साहो’ हा दुसरा सिनेमा आहे. या सिनेमातही तो प्रेक्षकांना ‘बाहुबली’सारखे खिळवून ठेवणार का, हे पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

Story img Loader