वय वर्षे ७७, उत्साह आणि कलाविष्कार मात्र तरुणांनाही लाजविणारा.. बासरीवादनात केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ज्यांचे स्थान सर्वोच्च आहे त्या पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या जादूई बासरीवादनामुळे विलेपाल्र्यात शुक्रवारी अक्षरश: नादब्रह्म अवतरले. निमित्त होते ते ‘लोकसत्ता’ प्रस्तुत ‘हृदयेश फेस्टिव्हल’च्या रौप्यमहोत्सवी वर्षांच्या पहिल्या दिवसाच्या समारोप सत्राचे. विलेपाल्रे येथील पाल्रे टिळक विद्यालयाच्या पटांगणात १२ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या चारदिवसीय सांगीतिक सोहळ्याच्या पहिल्या दिवशी कंठसंगीत व वाद्यसंगीताची पर्वणी रसिकांनी अनुभवली.
मुंबईतील सवाई गंधर्व महोत्सव अशी ख्याती लाभलेल्या हृदयेश फेस्टिव्हलचे हे पंचविसावे वर्ष. या महोत्सवात श्रवणभक्ती करण्यासाठी येणारे रसिक किती चोखंदळ व दर्दी असतात, याची जाणीव असल्याने हरीजींसारखे दिग्गज कलाकारही कसे खुलतात, याचा प्रत्यय शुक्रवारी रात्री नव्याने आला. त्यामुळेच, वाढत्या वयोमानामुळे जडलेल्या शारीरिक व्याधींना झुगारत हरीजींनी आपल्या श्रेष्ठत्वाचा आविष्कार rv10घडविला तेव्हा तुडुंब भरलेल्या अवघ्या प्रेक्षागारात वारंवार टाळ्यांचा कडकडाट होत होता. मारू बिहाग रागातील सुंदर सुरावटीने हरीजींनी मफलीची सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या हंसध्वनीने रसिकांना चतन्याची वेगळीच अनुभूती दिली. हरीजींना अनेकदा, अनेक ठिकाणी ऐकलेल्या श्रोत्यांनी हक्काने फर्माईशीही केल्या. या फर्माईशींचा मान राखत हरीजींनी खास ठेवणीतील मिश्र पहाडी धून सादर केली आणि तोच या मफलीचा उत्कर्षिबदू ठरला. या बासरीवादनाला तितकीच तोलामोलाची साथ लाभली ती तबल्यावर पं. विजय घाटे व पखवाजवर पं. भवानीशंकर यांची. श्रोत्यांमध्ये बसलेल्या राकेश चौरासिया, विवेक सोनार आणि देबोप्रिया चटर्जी या शिष्यांना रंगमंचावर बोलावून हरीजींनी त्यांनाही सहभागी व्हायला सांगितले आणि रसिकांनी गुरु-शिष्य परंपरेची महती अनुभवली.
दरम्यान, पहिल्या दिवसाच्या या सत्राची सुरुवात पं. विश्वमोहन भट्ट यांच्या मोहनवीणावादनाने झाली. पं. रविशंकर यांचे शिष्य असलेले विश्वमोहन यांनी सतार, वीणा आणि गिटार या वाद्यांचा मेळ साधत निर्माण केलेल्या मोहनवीणेच्या झणत्काराने रसिकांची मने जिंकली. त्यांनी शामकल्याण राग विस्ताराने सादर केला. कालानुरूप या रागाचे चलन कशा प्रकारे बदलत गेले, याचेही प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले. आपण राजस्थानचे असल्याचे आवर्जून सांगत त्यांनी ‘केसरिया बालमा पधारो म्हारे देस’ ही रचना गायन-वादनासह सादर करून मफलीची सांगता केली. विश्वमोहन यांनाही तबल्यावर पं. विजय घाटे यांनी साथ केली.
मध्यंतरापूर्वी किराणा घराण्याचे सध्याचे दमदार गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी पुरिया कल्याण या समयोचित रागाने मफलीत रंग भरले. यानंतर ख्याल तसेच पं. भीमसेन जोशी यांची ‘बाजे मुरलिया बाजे व सौभाग्गदा लक्ष्मी’ ही लोकप्रिय भजने सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. पं. रविशंकर, पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर या तिघा भारतरत्नांनी पाठ थोपटलेला नव्या पिढीतील हा कलाकार िहदुस्थानी अभिजात संगीताचा संपन्न वारसा पुढे नेत असल्याची ग्वाही रसिकांना मिळाली.
हरीजींना हृदयनाथ पुरस्कार
या कार्यक्रमादरम्यान पं. हरिप्रसाद चौरासिया यांना पं. विश्वमोहन भट्ट यांच्या हस्ते हृदयनाथ पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार आतापर्यंत लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, आशा भोसले, अमिताभ बच्चन व सुलोचनादीदी यांना देण्यात आला आहे. हा पुरस्कार ऑक्टोबरमध्ये देण्यात येतो. मात्र हृदयेश फेस्टिव्हलच्या रौप्यमहोत्सवानिमित्त यंदा हा अतिरिक्त पुरस्कार देण्यात आल्याचे हृदयेशचे प्रमुख अविनाश प्रभावळकर यांनी सांगितले. या महोत्सवाला विशेष सहयोग करणारे जयसत्य चॅरिटेबल ट्रस्टचे शिरीष गानू तसेच लोकसत्ता व अन्य प्रायोजकांचे आयोजकांनी आभार मानले.

Story img Loader