दिवंगत दिनानाथ मंगेशकर यांची नात, हृदयनाथ मंगेशकर यांची मुलगी व लता मंगेशकर व आशा भोसले यांची भाची राधा मंगेशकर यांनी आपल्याला आडनावाचा कोणताच फायदा झाला नाही, असं विधान केलं आहे. आमच्या आडनावाचा दुसऱ्यांनी वापर करून घेतला आणि त्यांचं सगळं सुरळीत चाललंय, असंही त्या म्हणाल्या आहेत.
‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनेलसाठी सौमित्र पोटे यांनी राधा मंगेशकरांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मला माझ्या आडनावाचा काहीच फायदा झाला नाही. कधीकधी कुठेतरी थोडीशी व्हीआयपी ट्रिटमेंट मिळते की एखाद्या ठिकाणी मोठी रांग असेल आणि मंगेशकर म्हटलं की लवकर सोडतात, एवढाच फायदा मला आडनावाचा झालेला आहे. मीही आडनावाचा काहीच फायदा करून घेतलेला नाही. दुसऱ्या लोकांनी आमच्या आडनावाचा वापर करून फायदे करून घेतलेत आणि सुरळीत चाललंय सगळं. फार छान आयुष्य ते जगत आहेत.”
पुढे त्या म्हणाल्या, “मी माझा फायदा करून घेतला नाही कारण मी कुठे त्याचा फायदा करून घेऊ? यात माझ्या कुटुंबाचा मोठेपणा आहे. माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं की कुटुंब गायकांचं आहे म्हणून तुम्ही गायलाच पाहिजे असा दबाव आमच्यावर कधीच नव्हता. ‘तुला जर गाणं निवडायचंय किंवा या क्षेत्रात यायचंय तर तो तुझा निर्णय असणार आहे. मी तुला काही मदत करणार नाही. मी तुझं नाव कुठे सुचवेन, तुला निर्मात्यांकडे किंवा संगीतकारांकडे घेऊन जाईन हे मी करणार नाही’, असं ते म्हणाले होते.”
पुढे राधा मंगेशकर म्हणाल्या, “भाव सरगमसारख्या मोठ्या मंचावरती बाबांनी मला संधी दिली. ‘द हृदयनाथ मंगेशकर’ यांनी मला त्यांच्याबरोबर सहगायिका म्हणून गाण्याची संधी दिली हे त्यांचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. याची मला पूर्ण जाण आहे आणि मी त्याचा कधी फायदा घेतला नाही. हे सगळं माझ्याच वडिलांचं आहे, आता मी राणी आहे, मी म्हणेन ते असं कधीच मी केलं नाही. त्यांनीही मला कार्यक्रमांमध्ये एका व्यावसायिक गायिकेसारखंच वागवलं. ते खूप कडक शिस्तीचे आहेत.”