महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला बोरिवलीत संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतकार म्हणून कारकिर्दीचे हे हीरकमहोत्सवी वर्ष असल्याच्या निमित्ताने सोहम प्रतिष्ठान आणि सूरश्री आयोजित आणि लोकसत्ता प्रस्तुत ‘अक्षय गाणे अभंग गाणे’ हा संगीतमय कार्यक्रम बुधवारी, ३० एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात रंगणार आहे.
गेली सहा दशके संगीतकार म्हणून भक्तीगीतं, प्रेमगीतं, भावगीतं, विराण्या, लावण्या अशा विविध संगीतप्रकारातून मुशाफिरी करणाऱ्या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना आजच्या तरूण पिढीतील गायक-गायिका या कार्यक्रमातून सुरेल अभिवादन करणार आहेत. पंडितजींनी स्वरबध्द केलेली, स्वत: गायलेली, अन्य संगीतकारांकडे गायलेली गाणी अशा एकाहून एक सरस गाण्यांच्या नजराण्यातून काही निवडक गाणी या कार्यक्रमात रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. ‘मोगरा फुलला’, ‘अवचिता परिमळू’सारखे अभंग, ‘म्यानातून उसळे’ आणि ‘हे हिंदूुनृसिंह’ सारखी वीरगीते, गाजलेली प्रेमगीतं या कार्यक्रमातून सादर करण्यात येणार आहेत. ऋषिकेश रानडे, विभावरी आपटे, अर्चना गोरेसारख्या नव्या पिढीचे गायक ही गाणी गाणार असून संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि राधा मंगेशकर यांचा या कार्यक्रमात विशेष सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाच्या सशुल्क प्रवेशिका नाटय़गृहावर सकाळी ८.३० ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत उपलब्ध होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा