अंधेरी येथील इमारतीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेले अग्निशमन दलाचे जवान नितिन इवलेकर यांच्या कुटुंबाचे बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनकडून सांत्वन करण्यात आले. अभिनेता हृतिक रोशनचे कार्यालय असलेल्या ‘लोटस बिझनेस पार्क’ या २२ मजली इमारतीला शुक्रवारी आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आगीत अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी आलेल्या अग्निशमनदलाच्या तुकडीत इवलेकरदेखील सामिल होते. परंतु, आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना मृत्यूने कवटाळले. अभिनेता हृतिकने येवलेकरांच्या कुटुंबियांना १५ लाखाची मदत केल्याचे समजते. परंतु, यासंदर्भातली अधिकृत पृष्ठी अद्याप करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर हृतिककडून प्रसिध्द करण्यात आलेल्या निवेदनात तो म्हणतो, आपण एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. आपल्याला गरज असताना अन्य लोकांनी मदत करणे महत्वाचे असते, त्यासाठी आपणसुध्दा पुढाकार घ्यायला हवा. खासकरून जेव्हा घरातील कर्ता माणूस कर्तव्य बजावत असताना मृत्यूमुखी पडतो. समाजासाठी करण्यासारखे खूप काही आहे, पण त्याची सुरुवात स्वत:पासून करणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी करता, तेव्हा कुठल्यातरी स्वरुपात केव्हातरी त्याची परतफेड नक्कीच होते असा मला विश्वास आहे. शूर आणि धाडसी नितिन इवलेकरांच्या कुटुंबियांसाठी माझ्या मनात प्रचंड आदर आहे आणि या दु:खद प्रसंगी मी त्यांचे सांत्वन करू इच्छितो.

Story img Loader