बॉलिवूडमध्ये सध्या एका मागोमाग एक दुःखद वार्ता ऐकायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गायक ‘केके’चं निधन झालं. ज्यामुळे संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. अशात आता अभिनेता हृतिक रोशनच्या कुटुंबातून दुःखद बातमी आली आहे. हृतिकच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं नुकतंच निधन झालं आहे. हृतिकची आजी म्हणजेच त्याच्या आईची आई पद्मा राणी यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. पद्मा राणी यांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी हृतिकचे वडिल राकेश रोशन यांनी केली आहे.
हृतिक रोशनचं त्याच्या आजीसोबत खूपच खास बॉन्डिंग होतं. पद्मा राणी यांच्या निधनानंतर रोशन कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पद्मा राणी या ९१ वर्षांच्या होत्या आणि मागच्या काही काळापासून त्या आजारी होत्या. गुरुवारी संध्याकाळपासूनच त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यासंबंधी निर्माता राकेश रोशन यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी या वृत्ताची पुष्टी केली. ते म्हणाले, “दुर्दैवाने ही बातमी खरी आहे. ओम शांती.”
रिपोर्ट्सनुसार पद्मा राणी यांचं निधन वयानुसार आलेल्या आरोग्याविषयी समस्यांमुळे झालं आहे. पद्मा राणी या प्रसिद्ध निर्माता ओम प्रकाश यांची पत्नी होत्या. मागच्या दोन वर्षांपासून पद्मा राणी या हृतिक रोशनच्या कुटुंबीयांसोबतच राहत होत्या. मागच्या काही वर्षांपासून त्या आजारी होत्या आणि त्यामुळे त्यांना स्वतःहून कोणतीही हालचाल करणं शक्य नव्हतं.