दोघांचेही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार
बॉलीवूडमध्ये एकाच दिवशी दोन किंवा तीन ‘बिग’ बजेट चित्रपट प्रदर्शित होणे ही काही नवलाईची गोष्ट नाही. बॉलीवूडमधील हा कल गेल्या काही वर्षांपासून मराठीतही सुरू झाला आहे. चित्रपटसृष्टीतील मोठे कलाकार असलेले वेगवेगळे चित्रपट एकाच वेळी आणि एकाच दिवशी प्रदर्शित झाले की त्याचा फटका त्या चित्रपटांना बसतो. त्यामुळे काही वेळा सामंजस्याने आपले चित्रपट समोरासमोर येणार नाहीत याचीही काळजी घेतली जाते. पण तसे झाले नाही तर या चित्रपटांचा ‘सामना’ रंगतो. बॉलीवूडचे आघाडीचे अभिनेते ऋतिक रोशन आणि अक्षयकुमार यांच्या चित्रपटांची ‘टक्कर’होणार असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये आहे.
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहोंजदडो’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटात ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत आहे. तर नीरज पांडे दिग्दर्शित ‘रुस्तुम’ हा अक्षयकुमारचा महत्त्वाचा चित्रपट असून हे दोन्ही चित्रपट येत्या १२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहेत.
‘मोहोंजदडो’ या चित्रपटाद्वारे पूजा हेगडे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत असून चित्रपटात कबीर बेदी यांचीही भूमिका आहे. मोहोंजदडो शहराच्या पाश्र्वभूमीवर साहस आणि प्रेमकथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे तर अक्षयकुमारचा ‘रुस्तुम’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येते. अक्षयकुमारच्या ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळविले होते.
ऋतिक रोशन आणि अक्षयकुमार यांचे हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होणार असल्याने ते एकमेकांना कशी टक्कर देतात याकडे दोघांचे चाहते आणि बॉलीवूडचे लक्ष लागले आहे.