बॉलिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशन तिकीटबारीवर नाव कमावून गेला असला तरी गेल्या वर्षीपासून त्याच्या पाठी लागलेले आजारपण आणि पत्नी सुझ्ॉनचा वेगळे होण्याचा निर्णय या दोन घटनांनी त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची घडी विस्कटून टाकली आहे. आजारपणामुळे हातात असलेल्या चित्रपटांवर त्याला पाणी सोडावे लागले आहे तर दुसरीकडे सुझ्ॉन परतण्याचे सगळे मार्ग बंद आहेत. अशा निराश अवस्थेत हृतिकने ‘बँग बँग’चे चित्रिकरण सुरू केले आणि त्याला आधार मिळाला तो नव्या मैत्रिणीचा. चित्रपटातील सहकलाकार कतरिना कैफ हिने त्याला यातून बाहेर पडण्यासाठी मदत करायची ठरवले आहे.
एकीकडे हृतिकला आजारपणामुळे चित्रपट सोडण्यासारखा वाईट अनुभव घ्यावा लागतो आहे. करण जोहरची निर्मिती आणि करण मल्होत्राचे दिग्दर्शन करणार असलेल्या ‘शुध्दी’ या चित्रपटात हृतिक रोशन आणि करीना कपूर-खान बऱ्याच काळानंतर एकत्र काम करणार होते. हृतिकच्या आजारपणामुळे चित्रपट आणखी सहा महिने पुढे जाईल, असे करण जोहरने जाहीर केले होते. मात्र, सहा महिन्यानंतरच्या तारखा जुळवून घेणे करीना कपूर-खानला अवघड जात असल्याने तिने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. करणने तिला परवानगीही दिली. पण, जे झाले ते योग्य नाही.. असे वाटल्याने असेल हृतिकने स्वत:च दिग्दर्शक करण मल्होत्राशी बोलून चित्रपट सोडला असल्याचे जाहीर निवेदन केले. अर्थात, हृतिक बाहेर पडल्यानंतरही करीनाने परत येण्याचे संकेत दिलेले नाहीत. एकीकडे करीनाकडून आलेला असा अनुभव गाठीशी असताना कतरिनाने मात्र त्याला सुखद धक्का दिला.
‘बँग बँग’चे चित्रिकरण करत असतानाच हृतिकच्या मेंदूला दुखापत झाली होती. त्यामुळे तेव्हा तर चित्रिकरण लांबलेच पण, ‘क्रिश’ प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा हृतिकचे दुखणे बळावले आणि त्याला उपचारांसाठी परदेशवारी करावी लागली. ‘बँग बँग’चे चित्रिकरण दुसऱ्यांदा लांबणार हे कळल्यावर कतरिनाने कुठलीही तक्रार न करत आपल्या सगळ्या पुढच्या चित्रपटांच्या तारखा नव्या तारखांप्रमाणे जुळवून घेतल्या. एवढेच नाही तर हृतिकला या वाईट मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तिच्याकडे असलेली तत्त्वज्ञानाची, अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय काय प्रयत्न करावेत, याची माहिती देणारी पुस्तके तिने त्याच्याकडे पाठवली. सध्या सिमला येथे चित्रपटाचे चित्रिकरण सुरू आहे तर तिथेही काम झाल्यानंतर हृतिकशी गप्पा मारून त्याचे मन मोकळे करण्याचा प्रयत्न कतरिना करते आहे. बहुधा, हृतिकच्या नात्याची गाठ सोडवता सोडवता रणबीरबरोबर बिघडलेल्या आपल्या नात्याचे कोडेही उलगडण्याचा तिचा प्रयत्न असावा.
एकमेव जलस्रोताचे संवर्धन!

Story img Loader