हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या प्रेमाची सुफळ कथा शनिवारी घटस्फोट घेऊन संपली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘क्रिश ३’ च्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या हृतिकने एक निवेदन देत आपली पत्नी सुझान हिने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर करीत चाहत्यांना धक्का दिला होता. त्यानंतर सुझाननेही निवेदन देऊन विभक्त होण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर एप्रिलमध्ये या दोघांनीही घटस्फोटासाठी न्यायालयाक डे अर्ज केला होता. शनिवारी वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात झालेल्या सुनावणीत त्यांना घटस्फ ोट मंजूर करण्यात आला.
वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात हृतिक आणि सुझान दोघेही उपस्थित होते. दोघेही वेगवेगळ्या गाडयांमधून आले होते. कुठलाही वादविवाद, चर्चा न करता दोघांनीही समजूतदारपणा दाखवत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली. १३ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आपल्याला हृतिकपासून वेगळे व्हायचे असल्याने सुझानने सहा महिन्यांपूर्वी वांद्रे न्यायालयात घटस्फ ोटासाठी अर्ज केला होता. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने दोघांना घटस्फोट मंजूर केला असून पोटगी आणि अन्य निर्णयाबद्दल आम्ही न्यायालयाबाहेर एकमेकांच्या संमतीने निर्णय घेऊ, असे दोघांनीही सांगितल्याचे मृणालिनी देशमुख यांनी सांगितले.हृतिक आणि सुझान यांना दोन मुले आहेत. सात वर्षांचा ह्रिहान आणि पाच वर्षांचा ऱ्हिदान दोघेही सध्या आईबरोबर वर्सोवा येथे राहतात. या दोघांचाही ताबा कोणा एकाकडे देण्यात आलेला नाही. आम्ही आपापले व्यवसाय सांभाळून समजूतीने दोघांचाही सांभाळ करू, अशी खात्री ह्रतिक आणि सुझानने दिली.

Story img Loader