‘आणि ते सुखासमाधानाने नांदू लागले..’ असा ज्या प्रेमकथांचा सुखान्त असतो अशा यादीमध्ये अभिनेता ह्रतिक रोशन आणि सुझान खान यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते. मात्र, गेले काही महिने या दोघांच्या प्रेमविवाहाची नौका वादळात सापडल्याची चर्चा होत होती. रोजच्या चर्चामुळे व्यथित झालेल्या ह्रतिकने ट्विटरवरून यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, शुक्रवारी त्याच ह्रतिकने स्वत:हून सुझान आपल्यापासून वेगळी झाली असल्याची कबुली देत १७ वर्षांचा आपला प्रेमविवाह संपुष्टात आला असल्याचे जाहीर केले.
एरव्ही लहान-मोठय़ा कार्यक्रमात किंवा बॉलिवूड पाटर्य़ामध्ये ह्रतिकबरोबर मिरवणारी सुझान ‘क्रिश ३’च्या कोणत्याच कार्यक्रमांना उपस्थित नव्हती. राकेश रोशन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुझान रात्री उशिरा आई-वडिलांबरोबर आली आणि कोणाशी फारसे न बोलता निघूनही गेली. त्यामुळेच त्यांच्या दोघांच्या संबंधात तणाव निर्माण झाल्याच्या चर्चानी जोर धरला. ‘काईट’ चित्रपटातील अभिनेत्री बार्बरा मोरीशी ह्रतिकची जवळीक वाढली होती आणि त्यामुळेच सुझानबरोबरच्या त्याच्या वैवाहिक नात्यात तणाव निर्माण झाल्याचे बोलले जाते. ह्रतिकने माध्यमांना दिलेल्या निवेदनात सुझानने आपल्यापासून वेगळे व्हायचा निर्णय घेतला आहे, असे सांगून तिच्या या निर्णयामुळे १७ वर्षांचे आपले नाते संपुष्टात आले असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. या दाम्पत्याला रेहान आणि रिदान हे दोन मुलगे आहेत.
आम्ही विभक्त होत असल्याच्या बातमीमुळे माझ्या चाहत्यांचा आणि इतर लोकांचाही लग्नसंस्थेवर असलेला विश्वास कमी होता कामा नये, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे. हा निर्णय पचवणे आपल्या कुटुंबालाही जड जात आहे. त्यामुळे निदान या काळात तरी आमचा व्यक्तिगतता जपली जावी, अशी विनंतीही त्याने चाहत्यांना केली आहे.
ट्रॅफिक सिग्नलवरच्या प्रेमाची अखेर
सिग्नलच्या लाल-हिरव्या दिव्यांकडे कं टाळून पाहत बसलेला नायक. त्याचवेळी त्याच्या बाजूला एक आलिशान गाडी येऊन उभी राहते. गाडीच्या काचांमधून हलकेसे डोकावणारा चेहरा.. त्याला बघताक्षणीच गोड वाटतो. काही मिनिटांत त्याच्या नजरेसमोर असणाऱ्या तरुणीची प्रत्येक गोष्ट त्याला भुरळ पाडून जाते. पहिल्या प्रेमाची जाणीव होऊन भानावर येईपर्यंत गाडी निघून गेलेली असते. आणि पुन्हा ती मित्राच्या लग्नात भेटते.. हा प्रसंग ह्रतिकच्या ‘कहो ना प्यार है’ या पहिल्याच चित्रपटातला असला तरी त्याच्या आयुष्यात वास्तवातही तो तसाच घडलेला होता. सुझान आणि ह्रतिक एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते, असे म्हटले जाते. पण, त्यांच्या प्रेमाची कहाणी मात्र ट्रॅफिक सिग्नलपासून सुरू झाली होती. ‘कहो ना प्यार है’ हिट झाल्यावर बॉलिवूडमध्ये आपली कारकीर्द वेगाने सुरू करण्याआधीच ह्रतिकने सुझानला अगदी चित्रपटातल्या कथानकाप्रमाणे मागणी घातली. अगदी त्याच्या मनाप्रमाणे चर्चमध्ये विवाहही केला. तेव्हापासून गेले १७ वर्ष हे जोडपे बॉलिवूडमधील आदर्श प्रेमी जोडपे मानले गेले.