भित्यापाठी ब्रम्हराक्षस.. ही म्हण आपल्या सर्वसामान्यांच्या परिचयाची आहे. बिपाशाच्या बाबतीत मात्र ही म्हण तिने कित्येकवेळा अनुभवली आहे. त्यामुळे तिची भिती कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. बिपाशाला एकटेपणाची, भुतांची, अंधाराची भीती वाटते आणि तरीही सगळ्यात जास्त भयपट तिच्याच नावावर आहेत. भयपट हा तिचा ब्रँडच झाला आहे जणू अशापध्दतीने तिच्याकडे एक संपला की दुसऱ्या भयपटाची ऑफर येऊन थडकते. आताही ती ‘अलोन’ नावाचा भयपट करते आहे आणि दर चित्रपटाच्या वेळी येतो तसा यावेळीही चित्रिकरण करताना एक थरारक अनुभव नुकताच तिच्या वाटय़ाला आला आहे.
‘अलोन’च्या आधी तिने विक्रम भट दिग्दर्शित ‘क्रिएचर थ्रीडी’ केला होता. भयपट करताना बरेचसे प्रसंग हे ग्रीन पडद्यावर, जितका जास्तीत जास्त अंधार करता येईल तितक्या अंधारात एखाद-दुसऱ्या कलाकाराबरोबर चित्रिकरण केले जाते. ‘क्रिएचर’च्या चित्रिकरणा दरम्यान याच अंधाराला घाबरून बिपाशाची पुरेवाट झाली होती. ‘मला अंधाराची सर्वात जास्त भीती वाटते. पण, गेल्या काही वर्षांत हेच चित्रपट माझ्याकडे आले आणि ते चांगले चालले. त्यामुळे भयपटांच्या ऑफर्स माझ्याकडे जास्त असतात. इतके चित्रपट करूनही माझ्या मनातली भीती काही संपत नाही. दरवेळी काही ना काही वाईट अनुभव येतोच.’, असे बिपाशाने ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले. ‘अलोन’च्या चित्रिकरणादरम्यान घडलेला प्रसंग हा दिवसाढवळ्या घडला पण, तिच्या जिवावर बेतणारा तो प्रसंग होता.
केरळच्या बॅकवॉटर्समध्ये ‘अलोन’चे चित्रिकरण सुरू होते. तिथे जेट स्की बोटीवर बसलेल्या बिपाशा आणि चित्रपटाचा नायक करण सिंग ग्रोव्हर या दोघांवर चित्रिकरण सुरू होते. एका क्षणाला ही बोट पाण्यात उलटी झाली आणि बिपाशा पाण्यात पडली. क्षणार्धात घडलेल्या या घटनेमुळे बिपाशा चांगलीच घाबरली. चित्रपटाची तंत्रज्ञ टीमही पाण्यापासून बरीच दूर असल्यामुळे सगळे किनाऱ्यावर उभे राहून बघण्याशिवाय काहीही करू शकत नव्हते. मात्र, करणने बिपाशा पाण्यात बुडते आहे हे पाहून पाण्यात उडी मारली आणि तिला किनाऱ्यावर आणले. पण, झाल्या प्रसंगाने बिपाशा एवढी घाबरली होती की पुन्हा मूळ पदावपर यायला तिला काही तास लागले. सगळे व्यवस्थित झाल्यानंतर तिने पुन्हा चित्रिकरणाला सुरूवात केली खरी.. पण, या प्रसंगाचा तिने चांगलाच धसका घेतला आहे. प्रत्येक भयपटाच्या वेळी काही ना काहीतरी वाईट प्रसंगाला सामोरे जाण्याचा बिपाशाचा अगदी ‘राज’ चित्रपटापासूनचा इतिहास आहे. आता तर अशा चित्रपटांचे चित्रिकरण पूर्ण करून घरी आल्यानंतर रात्री घरातले सगळे दिवे लावून मी झोपते. एवढी माझी भीती वाढली आहे, असे बिपाशा म्हणते.

Story img Loader