गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला करण जोहरचा रखडलेला ‘शुध्दी’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘शुध्दी’ चित्रपटातील प्रमुख जोडी हृतिक रोशन आणि करिना कपूरने चित्रपटातून काढता पाय घेतल्यानंतर रखडलेल्या या चित्रपटाचा निर्माता करण जोहरने ‘शुध्दी’साठी हृतिक रोशनने नफ्यात मोठी भागीदारी मागितली नसल्याचा खुलासा केला आहे. ‘शुध्दी’ चित्रपटाच्या नफ्यात चांगली भागीदारी मिळत नसल्याने हृतिक रोशन नाराज झाल्याचे वृत्त एका प्रमुख दैनिकाने प्रसिध्द केले होते. परंतु, निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने या अफवेवर पडदा टाकत टि्वटरवरील संदेशात म्हटले आहे की, हृतिक रोशनने ‘शुध्दी’च्या नफ्यात मोठी भागीदारी मागितल्याचे वृत्त बिनबुडाचे आहे. यात कोणतीही सत्यता नसून, हे दिशाभूल करणारे वृत्त आहे. फेब्रुवारी महिन्यात जारी केलेल्या एका निवेदनाद्वारे आपल्यामुळे या चित्रपटाला उशीर होऊ नये यासाठी आपण या चित्रपटातून बाहेर पडत असल्याचे हृतिकने म्हटले होते. ‘बँग बँग’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघातात हृतिक रोशनच्या मेंदुला झालेल्या दुखापतीमुळे ‘शुध्दी’चे चित्रीकरण सुरु होऊ शकले नाही. त्यानंतर हृतिक ‘क्रिश-३’ चित्रपटाच्या प्रसिध्दी कार्यक्रमात व्यस्त झाल्याने या चित्रपटास विलंब होण्यास सुरुवात झाली. हृतिक रोशननंतर चित्रपटातील प्रमुख नायिका करिना कपूरदेखील या चित्रपटातून बाहेर पडली. हृतिक आणि करिनाच्या जागी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण काम करणार असल्याच्या आफवा उठत होत्या. परंतु अद्याप कोणालाही या चित्रपटासाठी नक्की केले नसल्याचा खुलासा करण जोहरने केला आहे. ‘अग्निपथ’चा दिग्दर्शक करण मल्होत्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

Story img Loader