मेंदूवर झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर अभिनेता ह्रतिक रोशनला गुरुवारी रूग्णालयातून घरी पाठवण्यात आले. ‘बँग बँग’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान मेंदूला इजा झाल्यामुळे ह्रतिकवर चार दिवसांपूर्वी हिंदुजा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मेंदूत रक्ताची गाठ झाल्यामुळे त्याला दोन महिने त्रास होत होता. त्यामुळे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
हिंदुजा रुग्णालयातून बाहेर पडताना ह्रतिकने आपली तब्येत उत्तम असल्याचे सांगत चाहत्यांना अभिवादन केले. यावेळी वडील राकेश रोशनही त्याच्याबरोबर उपस्थित होते. शस्त्रक्रियेनंतर कमीतकमी चार आठवडे डॉक्टरांनी ह्रतिकला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले असल्यामुळे ‘बँग बँग’चे चित्रिकरणही पुढे ढकलण्यात आले आहे. अभिनेता धर्मेद्र यांनी ह्रतिकच्या तब्येतीची विचारपूस केली. धर्मेद्र यांनी ह्रतिकला यापुढे स्टंट्स करताना आपल्या तब्येतीची काळजी घेण्याचा प्रेमळ सल्लाही दिला आहे. तर ह्रतिकचा सर्वात जवळचा मित्र दिग्दर्शक करण जोहर यानेही त्याच्यासाठी आपल्या ‘यह जवानी है दिवानी’ या चित्रपटाची डीव्हीडी भेट दिली आहे. आजवर करणच्या कोणत्याही चित्रपटाचा विशेष खेळ ह्रतिकने चुकवलेला नाही. पण, त्याला ‘यह जवानी है दिवानी’चा खास शो पाहता आला नव्हता. त्यामुळे चार आठवडय़ांच्या या विश्रांतीदरम्यान ह्रतिकला हा चित्रपट पाहता यावा, यासाठी करणने ही  भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा