विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’प्रमाणेच रिषभ शेट्टी दिग्दर्शित कन्नड चित्रपट ‘कांतारा’बद्दल चांगलं आणि वाईट बरीच चर्चा झाली. बऱ्याच लोकांना हा चित्रपट प्रचंड आवडला तर काहींना यावर सडकून टीका केली. पण या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. १६ कोटीच्या बजेटमध्ये या चित्रपटाने तब्बल ४०० कोटींची कमाई केली. कन्नड चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा चित्रपट म्हणून कांताराकडे पहिलं जातं.
३० सप्टेंबरला ‘कांतारा’ हा प्रथम फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला, पण नंतर अवघ्या काही दिवसातच या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर खास लोकाग्रहास्तव हा चित्रपट हिंदी आणि तामीळमध्ये डब करून प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं कौतुक केलं. आता यामध्ये हृतिक रोशननेही या चित्रपटाचं कौतुक करत ट्वीट केलं आहे.
कांतारा पाहिल्यानंतर हृतिकने ट्वीट करत त्याचं मत व्यक्त केलं. तो म्हणाला, ” कांतारा पाहून मला बरंच काही शिकायला मिळालं आहे. रिषभ शेट्टीने अत्यंत निष्ठापूर्वक हा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर केला आहे त्यासाठी त्याचे अभिनंदन. उत्तम सादरीकरण, दिग्दर्शन आणि अभिनय. चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहताना अंगावर रोमांच उभा राहिला. संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन.”
हृतिकच्या ट्वीटला नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. काहींनी हृतिकचं कौतुक केलं आहे तर काहींनी त्याला खडेबोलदेखील सुनावले आहेत. ‘कांतारा’ आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदीमध्येसुद्धा उपलब्ध आहे. ओटीटीवरही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.