International Yoga Day 2022 : अभिनेता हृतिक रोशनची शरीरयष्टी पाहून तो फिटनेस त्याच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येतं. पण फक्त हृतिकलाच फिटनेसचं वेड नाही तर त्याची आई पिंकी रोशनही तितकीच फिटनेस प्रेमी आहे. जागतिक योग दिनाच्यानिमित्ताने चक्क पाण्यामध्ये त्यांनी योगासनांचे प्रकार केले. पिंकी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पाण्यामध्ये योगासन करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.
आणखी वाचा – ‘सम्राट पृथ्वीराज’नंतर ‘रक्षाबंधन’ही फ्लॉप होणार?, नव्या लूकमुळे अक्षय कुमार ट्रोल, नेटकरी म्हणाले…
हृतिकची आई पिंकी यांचं वय ६७ वर्ष आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल असा त्यांचा फिटनेस आहे. नेहमीच पिंकी सोशल मीडियाद्वारे वर्कआऊट, योग तसेच विविध व्यायाम प्रकार करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. जागतिक योग दिनाच्यानिमित्ताने त्यांनी पाण्यामध्ये योग केला. या व्हिडीओमध्ये पिंकी यांच्याबरोबर त्यांचे प्रशिक्षक दिसत आहेत. तसेच त्यांच्या सुचनेनुसार त्या पाण्यामध्ये योगासने करताना दिसत आहेत.
त्यांचा हा व्हिडीओ काही तासांमध्येच हजारो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबरीने त्यांच्या जिद्दीचं आणि फिटनेसचं सगळ्यांनी कौतुक केलं आहे. तसेच हा व्हिडीओ इतर महिलांसाठी खरंच प्रेरणादायी ठरणारा आहे. तसेच जागतिक योग दिनाच्यानिमित्ताने पिंकी यांनी विविध प्रकारची योगासनं करतानाचे फोटो देखील शेअर केले आहेत.
आणखी वाचा – VIDEO : पूजा सावंतने खरेदी केलं नवीन घर, जवळच्या मित्राने शेअर केला व्हिडीओ
हृतिकला फिटनेससाठी प्रेरणा बहुदा त्याच्या आईकडूनच मिळाली असावी. कारण बऱ्याचदा पिंकी फक्त योगासने किंवा व्यायामप्रकार नव्हे तर बॉक्सिंग करतानाही दिसतात. तरुणांना लाजवणारी त्यांची एनर्जी आणि फिटनेससाठीचं प्रेम खरंच कौतुकास्पद आहे. सध्या पिंकी यांच्या या व्हिडीओचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.