एकेकाळी हृतिक रोशन आणि सुझान खान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये गणले जायचे. अनेकांना ‘कपल गोल्स’ देणाऱ्या या जोडप्याने २०१६ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. हृतिक- सुझान जरी विभक्त झाले असले तरी त्यांच्या मुलांच्या योग्य संगोपनासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात. घटस्फोटाचा परिणाम मुलांवर होऊ नये याची पुरेपूर काळजी दोघंही घेत आहेत. मुलांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेणं, एकत्र डिनरला जाणं अशा छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी हृतिक- सुझान एकत्र येतात. सुट्ट्यांमधला असाच एक फोटो शेअर करत हृतिकने पूर्वाश्रमीची पत्नी सुझानसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

समुद्रात मुलांसोबत खेळत असताना सुझान त्यांचा व्हिडिओ काढत असल्याचा व्हिडिओ हृतिकने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या व्हिडिओसोबत त्याने ही पोस्ट लिहिली आहे. ‘सुझान..माझी सर्वांत जवळची मैत्रीण (माझी पूर्वाश्रमीची पत्नीसुद्धा) हे क्षण टिपत आहे. हा क्षण माझ्या मुलांना जणू एक महत्त्वपूर्ण गोष्टच सांगत आहे की, कल्पना आणि विचारांनी विभक्त झालेल्या विश्वातसुद्धा एकत्र राहता येतं. व्यक्ती म्हणून तुम्ही भिन्न असलात तरी तुम्हाला अविभाज्य राहता येतं. इथे सहनशील, साहसी, प्रेमळ असं जग आहे आणि त्याची सुरुवात घरापासून होते.’

घटस्फोटानंतरही हृतिक-सुझान अनेकदा एकत्र दिसले. हृतिक-सुझानचा एकमेकांसोबतचा वावर पाहता हे दोघं विभक्त झाल्याचे कोणालाच त्यांच्याकडे बघून वाटले नसेल. सुझान नेहमीच हृतिकच्या पाठीशी उभी राहिली. कंगनासोबतच्या वादातही तिने आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीची साथ सोडली नाही.