कथा- आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ३० मुलांना एकत्र आणून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी गणितज्ञ आनंद कुमार हे प्रयत्न करत असतात. हा चित्रपट आनंद कुमार यांनी गरीब मुलांना शिकवण्यासाठी घेतलेल्या कष्टांची आणि मेहनतीची कथा सांगतो.
रिव्ह्यू- ‘सुपर ३०’ या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशनने आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांचे व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांपुढे साकारले आहे. हृतिक (आनंद कुमार) बिहारमधील एका छोट्या गावातील गरीब कुटुंबामधील अतिशय हुशार मुलगा असतो. त्याचे कॅम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. परंतु हालाखीच्या परिस्थितीमुळे त्याला प्रवेश घेणे शक्य होत नाही. दरम्यान हृतिकच्या वडिलांचा मृत्यू होतो आणि संपूर्ण घराची जवाबादी हृतिकच्या खांद्यावर पडते.
हृतिक दारोदारी पापड विकून उदर्निवाह करु लागतो. एक दिवस अचानक पापड विकत असताना हृतिकला त्याच्या आधीच्या बॅचमधील टॉपर असणारा विद्यार्थी भेटतो. हृतिकची हुशारी लक्षात घेऊन तो हृतिकच्या नावाने आयआयटी कोचिंग क्लासेस सुरु करतो. आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी क्लासेसची मागणी वाढण्याच्या या काळात हृतिकच्या बुद्धीमत्तेला महत्व प्राप्त होते. कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून हृतिकच्या मदतीने पैसे कमवण्यासाठी त्याचा सिनीयर त्याला भरपूर पगार देत क्लासेस सुरु ठेवण्यास सांगतो. त्यामुळे हृतिकची आर्थिक परिस्थीती सुधारते. मात्र एका क्षणाला शिक्षणाचा हा बाजार पाहून हृतिकला ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वो बनेगा जो हकदार होगा’ या आपल्या वडिलांच्या वाक्याची आठवण होते. त्यानंतर चित्रटाची कथा वेगळ्या वळणावर जाते. पैश्याच्या मागे धावणारा हृतिक कोचिंग क्लासेसमध्ये शिकवण्याऐवजी आपली बुद्धीमतता समाजातील गरीब मुलांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतो आणि सिनेमाच्या कथानकाला गती मिळते.
हृतिक महागडे आयआयटी कोचिंग क्लासेस घेणं बंद करतो आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांसाठी मोफत आयआयटी शिक्षण देण्यास सुरुवात करतो. यासाठी तो ३० मुलांच्या तुकडीची निवड करतो ज्यांना तो ‘सुपर ३०’ या नावाने संबोधतो. समाजातील श्रीमंत माणसांशी वैर पत्करुन, कठीण परिस्थितीला समोर जात हृतिकने ज्या ३० मुलांवर कठोर परिश्रम घेतले आहे ती मुले आयआयटीमध्ये प्रवेश मिळवतात की नाही, या प्रवासात त्याला काय काय अडचणी येतात हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. आनंद कुमार यांच्या अफाट बुद्धिमत्तेची, सातत्याची, त्यागाची, कठोर मेहनतीची ही गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडण्यात दिग्दर्शक असणाऱ्या विकास बहल यांना यश मिळाले आहे. तसेच हृतिकचा अभिनयही वाखाणण्या जोगा आहे. अर्थात काही ठिकाणी त्याचा बिहारी भाषेतील लहेजा आणि सावळा रंग खटकतो पण सिनेमाच्या कथानकानुसार तो योग्यही वाटतो.
आनंद कुमार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी या चित्रपटात दाखवण्याचा एक चांगला प्रयत्न बहल यांनी केला आहे. या चित्रपटाला अजय-अतुल या जोडीने संगीत दिले आहे. एकंदरीत कथा, दिग्दर्शन, संकलन, अभिनय, संगीत आणि छायांकन या सर्वच बाबतीत हा चित्रपट एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे.