नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ने सध्या सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील नायक ‘परश्या’ आणि नायिका ‘अर्ची’ एका कार्यक्रमासाठी आले असता, त्यांना पाहण्यासाठी, स्वाक्षरी घेण्यासाठी व त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली. बराच प्रयत्न करूनही अतिउत्साही तरुणाईला रोखण्यात अपयश आल्याने कार्यक्रम उरकता घ्यावा लागला.
शुक्रवारी सायंकाळी तळेगावात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून आकाश ठोसर व रिंकू राजगुरू हे ‘सैराट’चे मुख्य कलाकार आले होते. त्यांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाल्यापासून तरुणाईची झुंबड उडाली. त्यांच्याशी बोलण्यासाठी, मोबाइलमध्ये छायाचित्र काढण्यासाठी चढाओढ सुरू झाली. व्यासपीठाभोवती गराडा पडला. त्यामुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
उत्साही कार्यकर्ते व तरुणांना काबूत आणण्यासाठी संयोजकांनी बरेच प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. मध्यभागीच झालेल्या गर्दीमुळे मागे बसलेल्या नागरिकांना कार्यक्रम पाहता येत नव्हता. ‘परश्या’ आणि ‘अर्ची’ची क्रेझ या निमित्ताने दिसून आली, मात्र तरुणाईच्या अतिउत्साहामुळे रसिकांचा रसभंग झाला.

Story img Loader