|| सुहास जोशी
एखादा विषय उत्तम असतो, त्यात नाटय़ असते, कारुण्यही असते पण अनेकदा त्याची बांधणी करताना सीरिजकर्त्यांचा दृष्टिकोनच पूर्णत: वेगळा असतो. त्यामुळे विषय काहीसा भरकटतो, भावनिकतेची जागा विनोदाने घेतली जाते आणि सरतेशेवटी त्यातून हाती काहीच लागत नाही. असंच काहीसं ‘ह्य़ूज इन फ्रान्स’ या नेटफ्लिक्सवरील ताज्या सीरिजमध्ये दिसून येते.
विषय तसा फार काही गहन नाही. गॅड हा फ्रान्समधील मोठा विनोदी कलाकार असतो. पण त्याच्या एकूणच वागण्याला, जीवनशैलीला कंटाळून त्याची बायको विवियन त्याला सोडून त्यांचा मुलगा ल्यूकबरोबर अमेरिकेत लॉस एंजेलिसला राहात असते. बऱ्याच वर्षांनतर गॅडला मुलाचा विरह सहन होत नाही आणि अखेरीस तो एकेदिवशी लॉस एंजेलिसला येतो. पण मुलाच्या मनात त्याच्याविषयी तिरस्कारच असतो. आईने जेम्स रॉस या अमेरिकी अभिनेत्याशी संसार मांडलेला असतो आणि ल्यूक त्यालाच वडील मानत असतो. ल्यूकला मॉडेलिंगच्या क्षेत्रात करिअर करायचे असते, जे गॅडला अजिबात रुचत नाही. काहीही करून ल्यूकला आपल्यासोबत घेऊन जायचे हाच गॅडचा उद्देश असतो. त्यासाठी तो अनेक क्लृप्त्या लढवितो. कधी त्या यशस्वी होतात तर कधी गॅड तोंडावर आपटतो. या सर्व गदारोळात अनेकदा खटके उडत राहतात. जेम्सने अभिनय सोडलेला असतो, त्याला पुन्हा अभिनय करायची हुक्की येते. तर गॅडलादेखील पुन्हा एकदा कॉमेडियन म्हणून काम करावे वाटत असते. दोघांचाही जीव ल्यूकमध्ये अडकलेला असतो.
अगदी कौटुंबिक म्हणावे असे हे कथानक. त्यात अवाजवी वाटावं असं फारसं काहीच नाही. पण गॅडचे कॉमेडियन असणं गृहीत धरून काही वेळा अतिशय बाष्कळ असे विनोदी प्रसंग यात घुसडले आहेत. संपूर्ण कथानकाला एक उंची गाठता आली असती ती पुरेशी गाठलीच जात नाही. परिणामी पाहणाऱ्यावर म्हणावा तसा परिणाम साधला जात नाही.
गॅड हा फ्रान्समध्ये खूपच प्रसिद्ध असतो, मात्र त्याला अमेरिकेत कोणीच ओळखत नसते. प्रत्येक वेळी तो त्याच्या कार्यक्रमाचे व्हिडीओज भ्रमणध्वनीवर दाखवून ओळख देत असतो. त्याला अमेरिकेतील मनोरंजनाचे क्षेत्र, येथील समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव वगैरे बाबींची फारशी जाणीवच नसते. गॅडचे हे अज्ञान सीरिजकर्त्यांनी अमेरिका आणि फ्रान्स या दोहोतील भेद मांडण्यासाठी पुरेपूर वापरले आहे. अमेरिकेतील कु टुंबव्यस्था, तेथील सामाजिक जीवन, मनोरंजनाच्या क्षेत्रातील विपणन अशा अनके बाबींचा वापर यासाठी केला आहे. तो अनेकदा खूपच प्रभावी वाटतो, तर कधी कधी अगदीच बालीश. समाजमाध्यमांच्या आहारी गेलेला अमेरिकी समाज दाखवतानाचे प्रसंग तुलनेने बरे आहेत. एकपात्री विनोदनिर्मितीची घसरलेली पातळी दाखवण्यासाठी तर ही तुलना खूपच उत्तम झाली आहे. असे काही मोजकेच प्रभावी प्रसंग यामध्ये दिसतात. बाकी सर्व सावळा गोंधळच आहे.
खरं तर या कथानकात एक भावनिक ओलावा आहे, पण पडद्यावर हा ओलावा जाणवतच नाही. कैकवेळा तर काही प्रसंग पाहताना नेमकं काय मांडायचं आहे हेच उमजत नाही. ल्यूकला मॉडेलिंगच्या रॅम्पवॉकसाठी शरीरात काही इम्प्लांट बसवायचे असतात. त्या शस़्त्रक्रियेनंतर जेम्स रुग्णाच्या खोलीतच बसून मोठय़ा आवाजात चित्रपट पाहात असतो. त्याला त्या चित्रपटातील भूमिका मिळालेली नसते त्यामुळे तो सतत त्या चित्रपटावर मोठय़ा आवाजात टीका करत असतो. हा संपूर्ण प्रसंगच पातळी सोडणारा आहे.
तुलनेने ही मालिका अगदीच मर्यादित अशा परिघात बेतलेली आहे. त्याच अनुषंगाने तिचा कालावधीदेखील मर्यादितच आहे ही त्यातल्या त्यात जमेची बाजू. खरं तर ही मालिका आणखीन उत्तम होऊ शकली असती. पण मुळातच सीरिजकर्त्यांना त्यात फार काही परिश्रम घ्यावेसे वाटत नसावे असेच दिसते.
ह्यूज इन फ्रान्स
ऑनलाइन अॅप – नेटफ्लिक्स
सीझन – पहिला