हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर काही सुरेख चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. यातील बरेच चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘हम आपके हैं कौन’. ९० च्या दशकात म्युझिकल हिट्सचा ट्रेंड आला असतानाच सूरज बडजात्या हा फॅमिली ड्रामा प्रकारातील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या वर्षातील सर्वाधिक कमाई केली होती. किंबहुना आजही टिव्हीवर हा चित्रपट लागला की अनेकजण ठाण मांडून बसतात. मल्टीस्टारर ‘हम आपके हैं कौन’मध्ये प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण, त्यातही नावाजली गेली ती म्हणजे सलमान खान आणि माधुरी दीक्षितची ऑनस्क्रीन केमिस्ट्री. अशा या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहे. त्याचाच आनंद अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्विटर अकाऊंटद्वारे व्यक्त केला आहे.
सलमान आणि माधुरीने साकारलेल्या ‘प्रेम’ आणि ‘निशा’च्या भूमिका त्या दिवसांमध्ये प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत झाले होते. त्याशिवाय प्रत्येक मुलीला प्रियकर हवा तर तो ‘प्रेम’सारखा असंच वाटू लागलं होतं.
Hum Aapke Hain Koun : released 25 yrs ago on 5th August 1994
Sooraj Barjatya’s film – One of the biggest blockbusters in Hindi Cinema pic.twitter.com/Y46vPUnfZs
— Film History Pics (@FilmHistoryPic) August 5, 2019
आणखी वाचा : इतकी वर्षे बॉलिवूडमध्ये काम करूनही काजोलला वाटते ‘या’ गोष्टीची खंत
प्रेम, मैत्री, कुटुंब, संस्कार आणि तडजोड या सर्व गोष्टींची प्रमाणशीर मांडणी करत हा चित्रपट सादर करण्यात आला होता. त्यातच ‘दिदी तेरा देवर दिवाना..’, ‘मौसम का जादू..’, ‘पहला पहला प्यार है..’ अशी जवळपास १४ गाणी या चित्रपटाला चार चाँद लावून गेली होती. मुख्य म्हणजे आजही या चित्रपटातील गाणी अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होउन २३ वर्षे उलटली असली तरीही त्याची जादू आजही कायम आहे असंच म्हणावं लागेल. काही चाहत्यांनी तर हा चित्रपट पाहण्याचा विक्रमच केला आहे. त्यातील संवाद, गाणी, सलमानचा अनोखा अंदाज आणि निशाचा खोडकर अंदाज या सर्व गोष्टी आजही तितक्याच नव्या आणि आपल्याशा वाटतात. अशा या सर्वांच्या आवडत्या चित्रपटातील तुमचं आवतं दृश्यं किंवा गाणं कोणतं?