साजिद खानचा चित्रपट म्हणजे आधीच प्रेक्षक धसका घेतात. त्यात ‘हमशकल्स’मध्ये पडद्यावर एक-दोन नव्हे तर तीन-तीन सैफ अली खान, तीन-तीन राम कपूर आणि तीन-तीन रितेश देशमुख असा प्रकार असेल तर प्रेक्षकांच्या ‘डोक्याला शॉट’ नसता झाला तरच नवल. सैफ अली खान आणि विनोदी भूमिका हे समीकरण कधीच जुळू शकत नाही, म्हणून दिग्दर्शकाने हुशारीने रितेश देशमुख, राम कपूर यांना घेतले आहे, इतकेच काय ते या चित्रपटातील शहाणपण होय. ‘मॅड कॉमेडी’ हा साजिद खानचा ब्रॅण्ड असला तरी आणि आपल्याच चित्रपटात संवादांतून साजिद खानने त्याच्याच ‘हिम्मतवाला’ या चित्रपटाची टर उडविण्याचा एकच अस्सल उपरोधिक विनोद केला असला तरी तब्बल १५९ मिनिटे पडद्यावर चाललेला डोक्याचा भुगा करणारा, अजिबात हसायला न येणाऱ्या माकडचेष्टा सहन करण्याची वेळ प्रेक्षकावर येते.
अशोक सिंघानिया हा गडगंज श्रीमंत उद्योगपती असून त्याची लंडनमध्ये आलिशान हवेली आहे. त्याचा मित्र कुमार हा क्लब चालवतो. उद्योगपती म्हणून काही येतच नसल्यामुळे का कोण जाणे कुमारच्या क्लबमध्ये स्टॅण्ड अप कॉमेडी करायला अशोक सिंघानियाला जाम आवडते. परंतु त्याच्या पर्यायाने साजिदच्या विनोदावर कुणालाच हसायला येत नाही हा पहिलाच प्रसंग चित्रपटात दाखविला आहे. चित्रपटातील या पहिल्याच प्रसंगाप्रमाणे सबंध चित्रपटभर प्रेक्षकांची हीच गत होते. विनोदासाठी विनोद, अंगविक्षेप, तोंड वेंगाडणे यामुळे हसावे की रडावे हे प्रेक्षकाला कळत नाही.
अशोक सिंघानियाचे वडील कोमामध्ये गेल्यामुळे सिंघानिया उद्योग चालविण्यासाठी अशोक त्याच्या कंस मामाची मदत घेतो. मामाजी सगळ्या उद्योगावर स्वत:ची मालकी प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असतो. सर्व इस्टेट स्वत:च्या नावावर करून घेता यावी म्हणून अशोकला तो वेडा ठरविण्यासाठी एका डॉक्टरच्या मदतीने विचित्र रसायन पाजून अशोकला वेडा करतो. दरम्यान अशोकला मामाजींची ही शक्कल समजते आणि हुबेहूब आपल्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तिरेखा सापडल्यानंतर अशोक आणि मामाजी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात.
हुबेहूब एकमेकांसारखे दिसणाऱ्या व्यक्तिरेखा, त्याद्वारे विनोदनिर्मितीसाठी लागणारे कथानक, विसंगती पडद्यावर दाखविताना मांडावी लागणारी तर्कसुसंगतता यासारख्या गोष्टींचा पूर्ण अभाव असलेला साजिद ब्रॅण्डचा हा चित्रपट आहे. अति तिथे माती उक्तीनुसार हुबेहूब दिसणारे दोन जण दाखविण्याऐवजी तीन जण दाखविल्यामुळे तीन तिगाडा काम बिगाडा अशी गत झाली आहे. अतिरंजितपणाचे प्रेक्षकांना अजीर्ण न झाले तरच नवल, अशा पद्धतीने दिग्दर्शकाने चित्रपट केला आहे.
वेडय़ांचे रुग्णालय, तिथले अशोक, कुमार या दोघांसारखे दिसणारे वेडे, त्यांची अदलाबदल, वेडय़ांच्या रुग्णालयातील सतीश शहाची व्यक्तिरेखा सगळेच कमअस्सल आणि बेगडी. एक मात्र खरे की अशोक सिंघानिया, कुमार आणि कंस मामा या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अनुक्रमे सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर यांनी केलेले प्रयत्न दाद देण्याजोगे आहेत. रितेश देशमुख आणि राम कपूर हे नसते तर सैफ अली खानची प्रमुख भूमिका पाहणे प्रेक्षकांना फारच जड गेले असते. रितेश देशमुख-बिपाशा बासू ही विजोड दिसणारी जोडी एकत्र आणण्याचा आणखी एक ‘मॅड’पणा दिग्दर्शकाने केला आहे.
दोन वेडय़ांना ‘टॉर्चर’ करतो असे सांगून वेडय़ांच्या रुग्णालयातील अधिकारी असलेला सतीश शहा त्यांना ‘हिम्मतवाला’ दाखवू का असे म्हणतो यातून दिग्दर्शकाने चांगला विनोद केला आहे, असे म्हणतानाच ‘हमशकल्स’पेक्षा ‘हिम्मतवाला’ बरा होता का, असा विचार करण्याची वेळ प्रेक्षकांवर येते. ‘मॅड कॉमेडी’त भर म्हणून चित्रपटात ४-५ गाण्यांचा कर्णकर्कश भडिमार केला आहे.
हमशकल्स
निर्माता – वासू भगनानी
दिग्दर्शक – साजिद खान
लेखक – फरहाद, साजिद खान
संगीत – हिमेश रेशमिया
छायालेखन – रवी यादव
संकलन – रामेश्वर भगत
कलावंत – सैफ अली खान, रितेश देशमुख, राम कपूर, बिपाश बासू, तमन्ना भाटिया, ईशा गुप्ता, सतीश शहा, दर्शन जरीवाला, चंकी पांडे व अन्य.
डोक्याला शॉट
साजिद खानचा चित्रपट म्हणजे आधीच प्रेक्षक धसका घेतात. त्यात ‘हमशकल्स’मध्ये पडद्यावर एक-दोन नव्हे तर तीन-तीन सैफ अली खान, तीन-तीन राम कपूर आणि तीन-तीन रितेश देशमुख असा प्रकार असेल तर प्रेक्षकांच्या ‘डोक्याला शॉट’ नसता झाला तरच नवल.
First published on: 22-06-2014 at 03:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Humshakals movie review even the courageous could not watch