‘वासू’गिरीवरचा सिनेमा किंवा त्याहीपेक्षा ‘वासू’गिरी करण्यात रमणाऱ्या एकाची प्रामाणिक कथा हा उल्लेख जास्त योग्य ठरेल, अशा शब्दांत दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी त्याच्या सिनेमाचा- ‘हंटर’चा- उल्लेख करतो. पण हिंदी चित्रपटांमध्ये लैंगिक संबंधांवर भाष्य करणारे विनोदी, गंभीर असे हरतऱ्हेचे चित्रपट येऊन गेले आहेत. त्यांची नावंही तितकीच स्पष्ट. मग तो ‘लव्ह, सेक्स और धोखा’ असेल, ‘जिस्म’ असेल किंवा आणखी काही.. पण वासूगिरी हा शब्द मराठी. त्याचा उलगडा अन्य भाषिकांना होणं कठीण असल्याने या चित्रपटाचं नामकरण ‘हंटर’ असं करण्यात आलं आहे. तरीही हा चित्रपट एकंदरीतच या विषयाकडे प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न असल्याचं हर्षवर्धन कुलकर्णी यांनी सांगितलं. ‘हंटर’चा नायक हा मंदार पोंक्षे नावाचा मराठी तरुण आहे. चित्रपटाच्या दोन्ही नायिका, दिग्दर्शक आणि अन्य मराठी कलाकार अशा मराठमोळ्या माणसांनी हाताळलेल्या या वासूगिरीवरच्या सिनेमाविषयी त्यांच्याशी गप्पा मारताना हिंदीत गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या अशा वेगळ्या चित्रपटांचा घेतलेला हा आढावा..
दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णीचा हा पहिलाच चित्रपट आहे. गेली काही वर्षे इंडस्ट्रीत पटकथाकार आणि जाहिरात दिग्दर्शक म्हणून ओळख असलेल्या हर्षवर्धनचं नाव ‘हंसी तो फंसी’ या चित्रपटाचा पटकथालेखक म्हणून गेल्या वर्षी ठळकपणे लोकांसमोर आलं. सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणिती चोप्रा या दोघांना घेऊन के rv11लेला ‘हंसी तो फंसी’ हा रोमकॉम पठडीतला चित्रपट असूनही तो तरुणाईला जास्त आवडला तो त्याच्या कथेमुळे. मध्यमवर्गातील आजच्या तरुण पिढीत घडलेली ही कथा आणि वास्तवातील वाटाव्यात अशा व्यक्तिरेखा यामुळे तरुण पिढीने तो चित्रपट डोक्यावर घेतला. मग दिग्दर्शक म्हणून स्वत:साठी त्याने वासूगिरीवरचा सिनेमा का निवडावा, असा प्रश्न सहज डोकावतो. ‘वासूगिरी’ ही काही नवीन संकल्पना नाही. शाळेत शिकण्याच्या वयापासून मराठी मुलांना वासूगिरी म्हणजे काय हे माहीत असतं. आपल्या आजूबाजूला असे अनेक तरुण असतात. मुळात जे आपलं रोजचं आयुष्य आहे ते चित्रपटातून प्रतिबिंबित झालं पाहिजे हा आपला उद्देश असल्याचं हर्षवर्धननं सांगितलं. माझ्या डोक्यात ही कथा होती. लैंगिकतेशी संबंधित असलेला सिनेमा म्हणजे मग तो द्वय़र्थी संवाद, अश्लील दृश्यं असाच असणार, अशी एक सर्वसाधारण कल्पना असते आपली. ‘हंटर’ याला अपवाद आहे. माझा नायक मंदार पोंक्षे हा त्याच्या पौगंडावस्थेपासून लैंगिक आसक्ती असलेला असा मुलगा आहे. त्याचा १४ वर्षांपासून ते पस्तिशीपर्यंतचा प्रवास ‘हंटर’मध्ये पाहायला मिळेल. तो पहिल्यापासून लैंगिक विषयाकडे ओढला गेला आहे. तो त्याचा सहजस्वभाव आहे आणि खरोखर असा एखादा तरुण असेल तर त्याचं आयुष्य काय असतं? त्याच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती, त्यांचे इतर संबंध या सगळ्याचं एक प्रामाणिक चित्र मांडण्याचा प्रयत्न आपण केला असल्याचं हर्षवर्धन सांगतो. ‘हंटर’ हा चित्रपट अनुराग कश्यप, विकास बहल यांच्या ‘फँ टम प्रॉडक्शन’ने प्रस्तुत केला आहे.
अनुराग या चित्रपटाशी फार नंतर जोडला गेला, असं हर्षवर्धनने सांगितलं. अनुराग आणि विकासला पटकथा आवडली. त्यांनी चित्रपट पाहिला आणि मग त्यांनी स्वत:हून हा चित्रपट प्रस्तुत करण्याचा निर्णय घेतला. ‘फँटम’सारखा बॅनर चित्रपटामागे असणं हेच मोठं काम आहे. त्यांनीच मग या चित्रपटासाठी खास योजना तयार केल्या. ‘हंटर’मध्ये मंदार पोंक्षेची भूमिका ‘शैतान’ फेम गुलशन देवियाहने रंगवली आहे. तर त्याच्या नायिका म्हणून राधिका आपटे आणि सई ताम्हणकर या दोन मराठी अभिनेत्री दिसणार आहेत. सईचा हा नायिका म्हणून पहिलाच हिंदी चित्रपट आहे. यात तिने पस्तिशीतील विवाहित स्त्रीची भूमिका रंगवली आहे. मला या चित्रपटातली भूमिका खूप आव्हानात्मक वाटली. एक पस्तिशीची मध्यमवर्गीय घरातील स्त्री तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या एका तरुणाशी लैंगिंक संबंध ठेवण्याचं धाडस करते. आतापर्यंत आपल्या rv12नायिका या त्यागमूर्तीच राहिल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात एखाद्या स्त्रीला मला अमुक एक गोष्ट नवऱ्याकडून मिळत नाही तर ती दुसऱ्याकडून मिळवण्याचा निर्णय घेणं इतकं सोपं असतं का? त्याही वेळी समाजाने घालून दिलेल्या ‘आदर्श’ चौकटी तिच्यासमोर असतातच आणि बऱ्याचदा स्त्रिया आपली इच्छा मारून या चौकटीत बंदिस्त राहणं पसंत करतात. या सगळ्या पाश्र्वभूमीवर ‘हंटर’मधली ज्योत्स्ना पूर्णपणे वेगळी ठरते, असं सई म्हणते. वयाच्या एका टप्प्यावर स्त्रीच्या मनात नेमके काय बदल होत असतात हे जाणून घेऊन ज्योत्स्ना साकारणं आपल्यासाठी आव्हान होतं, असं तिनं सांगितलं.
गेले काही दिवस सगळ्याच चुकीच्या कारणांसाठी चर्चेत असलेल्या राधिका आपटेने चित्रपटात तृप्तीची भूमिका केली आहे. मंदार पोंक्षेंच्या आयुष्यात आलेली तृप्ती ही आजची अत्याधुनिक विचारांची तरुणी आहे. ‘बदलापूर’नंतर एकदम बोल्ड अभिनेत्री असा शिक्का राधिकावर मारला गेला आहे. मात्र हा बोल्डपणाचा ठपका आपल्यावर आणि ‘हंटर’ या चित्रपटावरही उगीचच लावण्यात आला आहे, असं मत राधिका व्यक्त करते. लैंगिक विषयाची मांडणी करणारा चित्रपट म्हणजे तो ‘बोल्ड’च असणार असं काहीतरी गृहीतक मांडलं जातं. ‘हंटर’ हा अजिबात बोल्ड चित्रपट नाही. आपल्या समाजात या विषयावर खुलेपणानं बोलणंच पसंत केलं जात नाही आणि म्हणून मग हे बोल्ड वगैरेचं लेबल लावलं जातं. उलट, तृप्ती ही आजवरची एकदम सरळ-साधी भूमिका होती, असं राधिकाने सांगितलं. ‘शैतान’, ‘दॅट गर्ल इन यलो बूट’, ‘दम मारो दम’सारख्या हिंदी चित्रपटांमधून काम केलेल्या गुलशन देवियाहने या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका साकारली आहे. मंदारसारखा तरुण रंगवणं फारसं अवघड नाही, असं तो म्हणतो. चित्रपटाचा विषयच जगभरात कोणालाही अपील करेल असा असल्याने तिथे भाषेचा विचारच उरत नाही. मात्र, मराठी बोलण्याची ढब आत्मसात करण्यासाठी थोडी मेहनत घेतली असल्याचे तो म्हणतो..

असेच काही चित्रपट
हिंदीत लैंगिक संबंधावरच्या चित्रपटांचे ढोबळमानाने दोनच गट पाडण्यात आले आहेत. एक म्हणजे ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’ या विभागात मोडणारे चित्रपट आणि दुसरे म्हणजे अगदीच गंभीर किंवा बोल्ड पद्धतीने हा विषय रंगवणारे चित्रपट. ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’ या प्रकारातले चित्रपट जगभरात पाहिले जातात. हिंदीत गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या अशा चित्रपटांनी चांगलंच यश मिळवलं आहे. ‘मस्ती’, ‘ग्रँड मस्ती’, ‘क्या कूल हैं हम’ या चित्रपटांना तिकीटबारीवरही चांगलं यश मिळालं आहे. तरीही हा जॉनर संयत पद्धतीने हाताळणारे फार कमी दिग्दर्शक इंडस्ट्रीत आहेत. उलट, भट्ट कॅम्पने अशा प्रकारच्या चित्रपटांना ‘बोल्ड’ पद्धतीने सादर करत एक वेगळाच जॉनर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘जिस्म’, ‘रोग’सारख्या चित्रपटांनी एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार के ला आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अशा चित्रपटांमध्येही बदल होऊ लागले आहेत. अजय बेहल दिग्दर्शित ‘बी.ए. पास’, अनुराग कश्यपचा ‘दॅट गर्ल इन अ यलो बूट’ अशा चित्रपटांमधून या विषयाची गंभीरता वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. चित्रपटांची मांडणी कोणत्याही पद्धतीची असली तरी या चित्रपटांना एक प्रेक्षकवर्ग निर्माण होतो आहे, ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader